लोकदर्शन चंद्रपूर 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर- नियुक्तीपत्र स्वीकारतांना वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद अतिव समाधान देणारा असुन अशाप्रकारे सार्वजनिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान करणारा सन्मानजनक सोहळा हा सुध्दा संघर्ष व लढ्याचाच भाग आहे. यापुर्वी 3 एकर जमिनीपोटी एक नोकरी देण्यात येत होती ती आता 2 एकरवर एकास नोकरी दिली जात असून जमिनीला योग्य भाव मिळतो आहे. हा शेतकऱ्यांनी केलेल्या ऐक्य व संघर्षाचेच फलित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या मनोरंजन केंद्र सास्ती (धोपटाळा) येथे दि. 03 में, 2023 रोजी पार पडलेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, वेकोलि मुख्यालयाचे तांत्रिक निदेशकव्दय श्री. जयप्रकाश व्दिवेदी, श्री. अनिल कुमार सिंह, बल्लारपूर क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. सव्यसाची डे, भाजपा पदाधिकारी अरुण मस्की, हरिदास झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अहीर म्हणाले की, जमिनीच्या बदल्यात 22 प्रकल्पात 15 वर्ष प्रखर लढ्यातून वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना 11 हजाराचे वर नोकऱ्या व 2500 कोटी वाढीव मोबदला मिळवून दिला. या संघर्षात संबंधीत शेतकऱ्यांनी अनेक वर्ष साथ दिल्याने हे आंदोलन विरोधी पक्षात असताना सुध्दा यशस्वी होवु शकले. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी तातडीने वाढीव मोबदला कोल इंडीयाच्या माध्यमातून चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर येथील खाण प्रकल्पग्रस्तांना देण्याकरीता पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशात जमिनीच्या बदल्यात नोकरी हे धोरण केवळ कोल इंडीया व मॉइलमध्येच असल्याने लोकसभेत व स्टॅन्डींग कमिटीव्दारे तसेच आंदोलनाच्या माध्यमातून ही न्यायपूर्ण मागणी धसास लावण्यात यश मिळाले असेही ते म्हणाले. या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या अनुशंगाने वेकोलिचे आभार व्यक्त करीत अन्य प्रलंबित प्रश्न ज्यात सुटलेल्या जमिनीचे अधिग्रहण, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, अपात्र प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना भाषणातून दिले. या प्रकल्पामध्ये 75 टक्केहुन अधिक ओबीसी शेतकरी असल्याची जाणीव करुन देतांनाच अहीर यांनी ओबी कंपन्यामध्ये 50 टक्के स्थानिकांना असंतोषाच्या पार्श्वभुमीवर रोजगार द्यावा. राज्य सरकारचे 80:20 धोरण लागु करावे अशाही मार्गदर्शनपर सुचना केल्या या कार्यक्रमात 75 पुरुष-महिला वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत प्रदान करण्यात आली यावेळी प्रकल्पग्रस्त बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.