लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुका आरोग्य विभाग राजुरा द्वारे आयोजित तालुका स्तरीय आशा दिन छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांच्यासाठी प्रोत्साहनपर असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी राजुरा तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या सामाजिक संदेश असलेल्या रांगोळ्या, चित्रकला आणि सकस पोषक आहार साहित्य प्रदर्शनीचे निरीक्षण करून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उत्तम सादरीकरणाचे कौतुक केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आशा यांनी आपल्या नावाप्रमाणेच कोरोनाचा काळात संपूर्ण महाराष्ट्रात, देशात मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य अनमोल आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होण्यास मदत होत आहे.
या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगरदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, डॉ. अशोक जाधव, गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, तालुका आरोग्य सहाय्यक डॉ. मधूकर टेकाम, डॉ. सचिन नळे, डॉ. ओम सोनकुसरे यासह अशा स्वयसेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.