लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 18 उरण पनवेल हा रस्ता प्रवाशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून दररोज हजारो प्रवाशी या मार्गांवरून प्रवास करतात. मात्र उरण येथील उरण-पनवेल मार्गावरील दोन साकवच्या दुरुस्तीसाठी सोमवार (२० मार्च) पासून हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात सूचना फलक बसविले आहेत. त्यानुसार उरण – पनवेल मार्गावरील उरण रेल्वे स्थानक व आनंदी हॉटेलजवळील दोन साकव (मोऱ्या) नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी सोमवार (२० मार्च) पासून उरण-पनवेल मार्गावरील बोकडवीरा पोलीस चौकी ते उरण कोटनाका (राघोबा मंदिर ) हा मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.प्रवाशी वर्गांचे प्रवासात होणारे हाल, जनतेच्या मागणीचा विचार करून व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे समजते.
पर्यायी मार्ग :-
उरण पनवेल हा महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने उरण शहरात व शहरातून ये-जा करण्यासाठी नागरिकांनी नवीन शेवा-उरण चारफाटा मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.