यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घरकुल मंजुर करा.
♦️आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीस ८ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजुरी दिली. सदर यादीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लाभार्थी असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील लाभार्थ्यांवर अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक २४ जानेवारी, २०१८ च्या शासकीय परिपत्रकानुसार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक ८ फेब्रुवारी, २०२३ च्या शासकीय परिपत्रकानुसार जिल्हातील काही विशिष्ट तालुक्यातील लाभार्थ्यांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.
जिल्हातील प्रधानमंत्री आवास योजने मधून सुटलेले व इतर योजनेत सामाविश्ट नसलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत अर्ज मागविले होते. सदरहू अर्ज पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मुल १९५४ पोंभूर्णा – ४९२ बल्लारपूर- – २५७ कोरपना – ११४७ राजुरा- १३४८ चंद्रपूर- १०० वरोरा-११४५ गोंडपिपरी -८१५ असे एकूण ७२५८ प्रस्ताव अप्पर मुख्य सचिव, इमाव बहुजन कल्याण, विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडे सादर करण्यात आले. मात्र शासन स्तरावर मंजुरी देत असताना बल्लारपूर, पोंभूर्णा व मूल तालुक्यातील यादीला मंजुरी देऊन इतर तालुके वगळण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील भटक्या जमातीतील नागरिकांवर शासनाकडून घोर अन्याय झालेला आहे. भटक्या जमातीतील गोर गरीबांना हक्काचे घर असावे यासाठी शासनाने योजना तयार केली आहे मात्र योजनेचा लाभ देताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव होत असल्याने प्रत्यक्षात जिल्हातील अनेक गरजू लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे गोर – गरीब लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. अजूनही अनेक लाभार्थी कुळाच्या, मातीच्या कच्च्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेल्या भटक्या जमातीतील गरजू लाभार्थीना न्याय मिळणेसाठी राजुरा विधासभाक्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी द्वारे या गंभीर बाबी कडे शासनाचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, प्राप्त प्रस्तावाला मंजुरी दिली आहे परंतु या उत्तरांनी समाधान न झाल्याने पुनछ प्रश्न विचारून चंद्रपूर जिल्हातील उर्वरित तालुक्यातील घरकुलांना कधी मंजुरी देणार का? असा प्रश्न केला असता लवकरच उर्वरित सर्वच प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.