लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – विज्ञानाने प्रगती होते, मात्र अध्यात्माने संस्कार रुजते. त्यामुळे विज्ञानासोबतच समाजाला अध्यात्माची सुद्धा तेवढीच गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
महाशिवरात्री व भजन संमेलनानिमित्य कोरपना तालुक्यातील वडगाव येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले. ग्रामगीताचार्य विठ्ठल डाखरे महाराज यांच्या संकल्पनेतून वडगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक उपक्रम राबविले जातात. हभप डाखरे महाराज यांच्या या सामाजिक कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी दिले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच स्मिता किन्नाके, उपसरपंच सुदर्शन डवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे, कैलाश मेश्राम, खिर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक खेकारे, अभय मुनोत, अशोक आस्कर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दोन दिवसीय भजन संमेलनात जिल्ह्यातील जवळपास ३० भजन मंडळ सहभागी झाले आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीराम भोंगळे यांनी केले तर संचालन व आभारप्रदर्शन रामचंद्र काकडे यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.