लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
नाशिक :
जनतेला विविध विषयांवर भ्रमित करणारे राजकीय शुक्राचार्य मोठ्या संख्येने भोवती पसरले आहेत, त्यांच्यापासून जनतेने सावध राहावे असे आवाहन आज भाजपा प्रदेश कार्यकारिणीत मांडलेल्या राजकीय प्रस्तावात करण्यात आले आहे. तसेच या राजकीय शुक्राचार्यांपासून जनतेला वाचविण्यासाठी कंबर कसून सिद्ध होण्याचा संकल्पही या राजकीय प्रस्तावाद्वारे आज करण्यात आला.
राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला हा राजकीय प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला तेव्हा मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या प्रस्तावाला आ.श्री आशीष शेलार, खा. प्रीतमताई मुंडे, आणि माजी मंत्री श्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले.
हा प्रस्ताव मांडतांना ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर कडक शब्दात टिका केली. सत्ता गेल्यावर विरोधक प्रत्येक भाषणात फक्त “माझी सत्ता, माझी खुर्ची आणि माझा परिवार” याच्या पलिकडे काही बोलू शकत नाहीत, जनतेचे प्रश्नही मांडत नाहीत मात्र विविध विषयात जनतेच्या मनात भ्रम निर्माण करत राहतात. गेल्या अडिच वर्षात मोदी सरकारने जनतेला केलेली मदत आणि राज्यातील जनतेशी द्रोह करून बनविलेल्या विरोधकांच्या सरकारने केलेली अडवणुक यांची तुलना जनता करत आहे. आता एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वात आपले सरकार आल्यावर शेतकरी, महिला, मागासवर्गीय अशा विविध घटकांना न्याय देत मदत करत आहे.
एका गावी परवा एक संस्कार वाईन शॉप दिसले त्यात जसा आणि जितका संस्कार आहे, तसा आणि तितकाच राष्ट्रवाद, राष्ट्रवादी कॉन्ग्रेस मधे आहे, असे सांगून ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की हिंदू धर्म न सोडल्याने ज्या औरंगजेबाने छ.संभाजी महाराजांचे हाल हाल करून ठार मारले, त्या औरंगजेबाचा उदो उदो करत छ.संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका असे सांगणारा हाच पक्ष आहे. स्वराज्यशत्रू अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण याच पक्षाने नियमित करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे सर्व घटक फक्त जनतेत संभ्रम निर्माण करतात, विकासाच्या प्रत्येक प्रक्रियेचा विरोध करतात.
केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने केलेल्या विकास कार्यांचा धावता उल्लेख करून ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की भारताला विश्वगुरू पदी पुन्हा बघायचे असेल तर “भारत माता की जय” म्हणतानाच केंद्रात मोदींनी आणि राज्यात फडणवीस- शिंदेंनी जी विकासाची कास धरली आहे, त्याला बळ दिले पाहिजे आणि भ्रम निर्माण करणाऱ्या राजकीय शुक्राचार्यांना पराभूत केले पाहिजे.