लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर: ‘स्वप्न पाहण्यासाठी रात्र छोटी पडते आणि स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवसही अपुरे पडतात. यशाच्या बाबतीत आकाशापेक्षाही मोठी उंची गाठायची ईच्छा असणाऱ्यांना २४ तास सतत अव्याहतपणे परिश्रम घेत राहावे लागतात. अर्जुनाप्रमाणे ध्येयाकडे लक्ष्य केंद्रित करत वाटचाल करा, यश तुमचेच असेल असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
आत्मनिर्भर भारत, आरोग्य भारती व किरणाश्रय संस्था चंद्रपूर द्वारा आयोजित ‘बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर द ग्रॅज्युएट स्टुडंट्स’ या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘आत्मनिर्भर भारत’च्या जिल्हाध्यक्षा किरण बुटले, ‘नवराष्ट्र’चे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर, सोहम बुटले, हर्ष म्हशाखेत्री, यश तुपेकर, मनीष मोहदुरे, शेख रशीद, सेजल सहारे, लिलावती रवीदास, शुभम शेगमवार, सोनू सिंग, प्रकाश चाकूर, प्रशांत केशभट, शिवम मांडवे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, ‘स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव नेत्रदीपक करण्याची ताकद देशभरातील तरुणाईमध्ये आहे. तरुणाई ‘भारत माता की जय..’ असा जयघोष ज्यावेळी करते, त्यावेळी संपूर्ण जगाला कळते की, भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती आहे. आपल्या देशातील तरुणाईची ऊर्जा ईतकी आहे की, त्याने अज्ञानाचा अंध:कार पूर्णपणे दूर केला जाऊ शकतो. तरुणाईने समाजाची चिंता करीत समाजसेवेमध्येही योगदान दिले पाहिजे. हे योगदान देणे आपले समाजाप्रती असलेले दायित्व आहे. देशहितासाठी चांगले कार्य करणे, ही विद्यार्थी, विद्यार्थीनीं सोबत सर्वांची राष्ट्रीय जबाबदारी आहे.’
‘जग जेव्हा बदलायचे तेव्हा बदलेल, परंतु मी मात्र बदलण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा उपयोग करेल’, असा संकल्प देत ना. मुनगंटीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह भरला. पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, १६ मार्च १९९५ मध्ये आपण प्रथम आमदार झालो. तत्पूर्वी १९८९ मध्ये प्रथम लोकसभा लढविली, त्यावेळी आपण एम.फिलचे विद्यार्थी होतो. राजकारण करीत असताना समाजकारण आणि अध्ययनाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. प्रत्येकाला आयुष्यात कतृत्वाने मोठे होता येते, परंतु त्यासाठी प्रत्येकाने तसा संकल्प करणे गरजेचे आहे.
पाच वर्ष अर्थमंत्री असतानाचा अनुभव विशद करताना, ना. मुनगंटीवार यांनी सांगितले की, अर्थमंत्री पदावर काम करताना अनेक यशस्वी उद्योजक, अभिनेता आणि मान्यवरांशी भेटीचा योग आला. यासर्वांमध्ये एकच समानता दिसली ती म्हणजे, त्यापैकी कुणीही आपल्या लक्ष्यापासून दूर गेले नाही. प्रत्येकामध्ये काहीना काही शक्ती, काही बलस्थाने असतात. ही शक्ती, बलस्थाने ओळखत कतृत्वाने मोठे व्हावे. प्रत्येक जण निश्चितच यशस्वी होणार आहे, यात शंकाच नाही. परंतु यशाची मोठी उंची गाठत असताना समोर येणारे कोणतेही चांगले कार्य मनापासुन करावे. आजच्या युगात विद्यार्थिनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे यश नेत्रदीपक असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत ना. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा घेण्याचा मनापासून सल्ला दिला.
कार्यक्रमाचे संचालन राशीद शेख व सेजल सहारे यांनी केले. अनेक महाविद्यालयांचे व विशेषतः शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.