लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :
,,,,,,,,,,,,,,,,,,
– कोरपना तालुक्यातील आवारपूर परिसरात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरातील “आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल विद्यालया” च्या ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या ११ वार्षीक ३ विद्यार्थ्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ जानेवरी रोजी उघडकीस आली.सुरक्षेच्या बाबतीत अगदी चोख असल्याचे दावे करणाऱ्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा खरा चेहरा या घटनेमुळे समोर आला असून कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कंपनीच्या सुरक्षेबाबत तीव्र शब्दात नाराजीचे सूर उमटत आहे.पारस सचिन गोवारदिपे वय वर्ष १०,दर्शन शंकर बता शंकर वय वर्ष ११,अर्जून कुमार सिंग वयवर्ष १० असे बालकांची नावे असून सदर तलाव धोकादायक असल्याची कल्पना असूनही घटनास्थळी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे गरजे होते.मात्र कंपनी प्रशासनाची हलगर्जी व दुर्लक्षितपणामुळे ३ निष्पाप चिमुकल्यांनी जीव गमावल्याचे आरोप होत आहे.
कंपनी व वसाहतीतील मोठ्याप्रमाणात निघणारे सांडपाणी साठवून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हे तलाव बऱ्याच प्रमाणात खोल व विस्तीर्ण आहे.वास्तविक पाहता तलावाचा परिसर धोकादायक असल्याने या ठिकाणी सुरक्षा संदर्भातील चिन्हे,सावधानीचे फलक आणि सुरक्षा कर्मचारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे असून कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.निर्मनुष्य व मोकळा परिसर असल्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले याठिकाणी खेळण्यासाठी जात होती.असे असताना कंपनी प्रशासनाने सुरक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारची उपाययोजना याठिकाणी केलेली नव्हती.परिणामी ३ बालकांचा याठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप होत आहे.
२६ जानेवारी निमित्त आयोजित शाळेतील कार्यक्रम संपल्यावर हे तिनही मित्र खेळण्यासाठी तलाव परिसरात गेले.दरम्यान पोहण्याच्या उद्देशाने ते तलावात उतरले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.सायंकाळ होऊनही मुले घरी न परतल्याने शेवटी पालकांनी त्यांच्या शोध सुरू केला.अशातच सिमेंट कंपनीच्या परिसरातील तलावाच्या काठावर या तीनही मुलांच्या चपला आणि कपडे आढळले.हे पाहून त्यांना वेगळीच शंका आली आणि याची माहिती पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली.पाणी जास्त तसेच रात्रीची वेळ असल्याने मध्यरात्री शोध मोहीम थांबवावी लागली. आज २७ जानेवारी रोजी सकाळी चंद्रपूर बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली असता दोन तासाच्या परिश्रमाने तलावाच्या तळातील गाळात फसलेल्या या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे,जमादार संदीप अडकिने,नपोशि धर्मराज मुंडे व इतर सहकार्यांसह स्थानिक गोताखोर तसेच चंद्रपूर येथील बचाव पथकाने अथक परिश्रम करून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले शवविच्छेदन करिता गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून गडचांदुर पोलीस पुढील तपास करीत आहेत. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे
सदर घटनेबद्दल कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही.अल्ट्राटेक परिसरामध्ये घडलेल्या घटनेस कंपनी प्रशासनच जबाबदार असून त्यांनी खोदलेल्या तलावाची अनेकांना माहीती नाही.तसेच तलावाच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक किंवा धोक्याची सुचना देणारे फलक अथवा सांकेतिक चिन्ह लावलेले नाही त्यामुळेच ही घटना घडली असून कंपनी प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.