गोंडी भाषेच्या शब्दकोषाची (डिक्शनरी) निर्मिती व्हावी* *गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती यांनी दिले गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना निवेदन*

 

लोकदर्शन 👉संकेत कुळमेथे

चंद्रपूर :- भाषा ही प्रत्येक समूहाचे अस्तित्व व सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांमध्ये गोंडीयन समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची मूळ व दैनंदिन भाषा ही गोंडी आहे. त्या भाषेचे संवर्धन व्हावे आणि आदिवासी समूहाचा सांस्कृतिक वारसा टिकून राहावा यासाठी गोंडी भाषा शब्दकोषाची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घ्यावा या आशयाचे निवेदन दि. 25 जानेवारी ला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना देण्यात आले.

गोंडी भाषेचे संवर्धन व्हावे व ती टिकावी यासाठी डॉ. मोतीरावन कंगाली यांनी देशपातळीवर गोंडी भाषा मानकिकरण कार्यशाळेचा उपक्रम राबविला व तीन हजार शब्दांचा गोंडी भाषेचा शब्दकोष तयार केला. या शब्दकोषाचे प्रकाशन कर्नाटक राज्यातील कन्नड विद्यापीठ हम्पी यांनी केले.

मध्य भारतातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंडी भाषा बोलल्या जाते. गोंडी भाषेचे शब्द विद्यार्थी मनावर बिंबवण्यासाठी गोंडी भाषा शब्दकोष तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जागतिक भाषा तज्ञ तथा गोंडी भाषा तज्ज्ञांची मदत घेऊन गोंडवाना विद्यापीठाने गोंडी भाषा शब्दकोष तयार करून प्रकाशित करावा अशी मागणी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवती यांच्या शिष्टमंडळाने केली.

शिष्टमंडळाने सध्या गोंडवाना विद्यापीठाने वनाधिकार व पेसा कायदे थेट आदिवासी कार्यकर्त्यांना शिकवणारा अभ्यासक्रम सुरू केला त्याबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे अभिनंदन करून आभार मानले.

या शिष्टमंडळात गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव व गोंडी भाषा मानकिकरण समितीचे सदस्य बापूरावजी मडावी, गोंडी भाषा व संस्कृतीचे अभ्यासक, साहित्यिक नंदकिशोर नैताम, युवा सामाजिक कार्यकर्ते नितीन बावणे, संकेत कुळमेथे, गोविंद वाघमारे उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *