लोकदर्शन मुंबई 👉 शिवाजी सेलोकर
मुंबई, दि. 21 जानेवारी 2023:
संस्कार असतील तरच संस्कृती टिकेल, व्यक्ती टिकेल आणि समाज टिकेल. शिक्षणामुळे केवळ पैसे कमावता येतात, मात्र शिक्षणासोबत संस्कार नसतील माणूस केवळ पैशाचा गुलाम राहील. त्यामुळे जीवनात आनंद राहणार नाही. म्हणूनच संस्कारांशिवाय शिक्षण हे व्यर्थ आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना विद्या मंदिरात आयोजित वृक्षारोपण समारंभात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की धन संपत्ती केवळ याच जन्मात पुरते. मात्र वने नसतील तर श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनच मिळणार नाही. जगातील सर्व तत्वचिंतकांनी वृक्षाखालीच तप करून ज्ञान मिळवले आहे. त्यामुळे धन संपत्ती पेक्षा वन संपत्ती अधिक महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.
पवना विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या विद्यार्थ्यांमधून खरे निसर्गप्रेमी आणि महान पद्म पुरस्कार विजेते निर्माण होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या शिक्षण संस्थेचा कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या मानस प्रसंशनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर स्थानिक आमदार सुनिलअण्णा शेळके, उद्योगपती पद्मभूषण श्री राजूभाई श्रॉफ, श्रीमती श्रॉफ, श्री खोराकीवाला, श्री सुमित चोक्सी, श्री राहुल महिवाल, श्री राहुल पाटील, परिसरातील सर्व गावांचे सरपंच व उपसरपंच, पवना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श री संतोष खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना.श्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी परिसरातील विविध संस्था, राजकीय कार्यकर्ते आणि ग्राम पंचायती यांच्यातर्फे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विविध समस्या आणि अन्य विषयातील निवेदनेही सादर करण्यात आली.
—-
तत्पूर्वी पवना प्रॉपर्टी ओनर्स असोशिएशनने ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार केला. त्यावेळी बोलतांना ना.श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की वीस वर्षांपूर्वी हा परिसर उजाड होता. मात्र पवना प्रॉपर्टा ओनर्स असोशिएशन ना या परिसरात हजारो झाडांची लागवड करून आणि जोपासना करून हा परिसर हिरवा गार बनवला, हे अनुकरणीय आहे. पवना प्रॉपर्टी ओनर्स असोशिएशन चे अध्यक्ष पद्मभूषण श्री राजू भाई श्रॉफ यांच्या पुढाकाराने आणि ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेने या परिसरात आणखी 50 हजार वृक्ष या वर्षभरात लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच पुढील काही वर्षात एकून दहा लाख वृक्ष या परिसरात लावण्याचाही संकल्प केला आहे. या परिसरातील शाळांमध्ये पवना प्रॉपर्टी ओनर्स असोशिएशन तर्फे अनेक शैक्षणिक सुविधा पुरविणार असल्याचेही असोशिएशन तर्फे सांगण्यात आले.