लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– कबड्डी हा आपल्या मातीशी नाड जुडलेला खेळ आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळल्या जाते. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या खेळाला लोकमान्यता मिळाली आहे. विदर्भातील नामांकित कबड्डी संघांच्या खेळाडूंच्या चित्त थरारक खेळाचे प्रदर्शन बघता यावे, कबड्डीचे कौशल्य आत्मसात करता यावे या हेतूने राजुरा क्षेत्रातील कबड्डी प्रेमी जनतेसाठी विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कबड्डीप्रेमींसाठी हा आमदार चषक रोमांचक अनुभव ठरणार आहे. त्यामुळे राजुरा येथे दिनांक २०,२१, २२ जानेवारी २०२३ या तीन दिवसांत संपन्न होणाऱ्या या आमदार चषकात क्षेत्रातील समस्त जनतेने उपस्थित राहून रोमांचक कबड्डी सामन्यांचा आश्वाद घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी थेट आमदार चषक कबड्डीचे आयोजन स्थळ महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. या प्रसंगी सेवा कलस फाउंडेशन राजुरा चे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी महासंघाचे पदाधिकारी दिलीप रामेडवार, सुभाष गौर, कुणाल चहारे, एजाज अहमद, प्रा. प्रफुल्ल शेंडे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेत पुरुष व महिला गटातून पुलगाव, नागपूर, उमरेड, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, मोर्शी, बुलढाणा, यवतमाळ, अजनी, सावनेर, भिवापूर, हिंगणघाट, चंद्रपूर सह विदर्भातील ३२ पुरूष तर १६ महिला कबड्डी संघांचा समावेश असणार आहे. या चषकाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री पुजा सावंत, बंगाल वारियर, दबंग दिल्ली चे प्रो कबड्डी खेळाडू यांच्या उपस्थितीत दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. तेव्हा सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होऊन तीन दिवसीय कबड्डी सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आमदार सुभाष धोटे यांच्या संकल्पनेतून राजुरा कल्ब राजुरा द्वारा आयोजित या चषकात पुरुष गट आणि महिला गट अशा दोन गटात कबड्डी चे सामने होणार आहेत. पुरुष गटात प्रथम पुरस्कार ७१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय रामचंद्रराव धोटे माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार सुभाष धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय सुधाकरराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनील देशपांडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तर महिला गटात प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपये रोख व चषक, स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर माजी आमदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती सुमनताई मामुलकर यांच्यातर्फे आणि द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये रोख व चषक, श्रीमती मालतीबाई धोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच इतर अनेक वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक २२ जानेवारी रोजी शानदार सोहळ्यात होणार आहे.