लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 9 जानेवारी श्री जरीमरी आई नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ-उरण यांच्या सौजन्याने दिनांक 06,07,08 जानेवारी 2023 रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी भेंडखळ महोत्सव 2023 (पर्व 2रे) चे आयोजन करण्यात आले होते.दिनांक 06 जानेवारी रोजी श्री जरी मरी आई देवीचा अभिषेक, उदघाटन सोहळा,चित्रकला स्पर्धा, बेंजो स्पर्धा, महिलांचे भजन, होम मिनिस्टर, गाथा भेंडखळ गावाची, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी मॅरेथॉन स्पर्धा, कवी संमेलन, शालेय मुलांच्या स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, मंगळागौर स्पर्धा, कराटे स्पर्धा, अनुभव प्रवासाचा तर 8 जानेवारी रोजी शालेय मुलांच्या स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, सुरेल गीतांचा कार्यक्रम,सर्प प्रदर्शन, नृत्य स्पर्धा बक्षीस वितरण आणि सांगता समारोह असे विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच उपक्रमांना जनतेचा, रसिक प्रेषकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.श्री विठोबा देवस्थान भेंडखळ, महिला मंडळ भेंडखळ, भेंडखळ क्रिकेट क्लब, रा.जि.प शाळा,भेंडखळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भेंडखळ यांच्या विशेष सहकार्याने या भेंडखळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ-उरण आयोजित तीन दिवसीय भेंडखळ महोत्सवात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष के. एम. मढवी, कार्याध्यक्ष हरिभाऊ घरत, संमेलन प्रमुख तसेच निवेदक कविश्री अरुण द. म्हात्रे, भेंडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कवी संमेलनात हरिश्चंद्र माळी, जयंत पाटील, भगवान ठाकूर, के. एम. मढवी, हरिभाऊ घरत, अरुण द. म्हात्रे, भ. पो. म्हात्रे, किरण घरत, मंगेश घरत, भूषण ठाकूर इत्यादी सर्वांनी भक्तीरस तसेच विविध विषयांच्या सुंदर कविता सादर केल्या. त्यामुळे हे कवी संमेलन बहरले. सर्व कवी गणांना मंडळ आणि ग्रामस्थ यांच्याकडून फुल, प्रमाणपत्र, आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने आणि सांगता अध्यक्ष के. एम. मढवी यांच्या अध्यक्षीय मनोगताने झाली. सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन / निवेदन आणि आभार प्रदर्शन कविश्री अरुण द. म्हात्रे यांनी उत्तम केले.