By : Ajay Gayakwad
वाशिम /मालेगाव
पत्रकार हा समाजाचा एक आधारस्तंभ मानला जातो. त्यामुळे पत्रकारांनी दुर्लक्षित घटक व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या समस्या आपल्या लेखनीतून मांडल्या पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांचे असून त्यामधूच तो सुदृढ समाज व्यवस्था उभी करू शकतो. अशा प्रकारचे विचार मराठी पत्रकार परिषद मालेगावचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वसंतराव अवचार यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
६ जानेवारी हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असून तो पत्रकार दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, तर प्रमुख उपस्थिती गजानन देशमुख शिरपूर, भास्कर गुडदे, तालुका सचिव शिवाजी खडसे यांची होती. यावेळी प्रा. अवचार पुढे म्हणाले की, पत्रकारांनी समाजासमोर आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली पाहिजे. तरच समाज सुद्धा आपल्याकडे आदरयुक्त भावनेने बघेल. आज शेतकरी हा चोहोबाजूनी नागवला जात असून त्यांचा वाली कोणी उरला नाही. शासनानेसुद्धा त्यांना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे या संकटात सापडलेल्या बळीराजाला हात देण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही प्रा. वसंतराव अवचार म्हणाले.
यावेळी गजानन देशमुख , गोपाल वाढे, किरण पखाले, भागवत मापारी , प्रशांत लोखंडे , दीपक सारडा यांनी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. पत्रकारांवर जर कुठे काही अन्याय व अत्याचार होत असेल अशा वेळी सर्वानी एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. अरविंद गाभणे यांनी आपल्या लेखणीतुन कोणावरही अन्याय होऊ देऊ नका , व आपण तो सहनही करू नका . एकोप्याने व संघटीत राहा .तालुका मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य कैलास भालेराव यांच्यावर शिरपूर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत . याबाबत तालुका मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांच्या नेतृत्वात भेटून संबंधित दोशींवर कारवाई करून हेतुपुरस्सर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात बाबत विनंती करणार असल्याचे सांगितले . कार्यक्रमाला विठ्ठल भागवत ,कपिल भालेराव , विठ्ठल केळे , सोहेल पठाण ,
भास्करराव गुडदे , चंद्रकांत गायकवाड संदीप देशमुख ‘ जाधव , राजु यादव, अजय गायकवाड,सेवालाल आडे , आदी पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते . प्रास्ताविक व संचालन भास्कर गुडदे यांनी केले .