By : Shankar Tadas
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी नवीन अद्ययावत मोबाईल फोन मिळावे, निवृत्तीनंतरचे लाभ वेळेवर मिळावेत, अंगणवाडी केंद्राचे भाडे वेळच्या वेळी मिळावे यांसह अनेक मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत होत्या. मंत्रालयात त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवून त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीट समजावून घेतले. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढून त्यांना दिलासा देण्याबाबत शासन अनुकूल असल्याचे याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सांगून त्यांना यासमयी आश्वस्त केले. याप्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नेते एम.ए.पाटील आणि अंगणवाडी सेविकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.