By : Shankar Tadas
चंद्रपूर :
मार्गालगतच्या शेतातील जागा निवाऱ्यासाठी अनेकांनी घेतली होती. तिथं पक्की घरेही बांधण्यात आली. आता मात्र राजुरा – गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गामुळे ती जागा गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. कारण या जागेचा आणि बांधकामाचा मोबदला शासकीय नियमानुसार मूळ शेतमालकाला मिळतो आहे. स्टॅम्पवर लिहून घेतलेल्या या जमिनीची नोंद ग्रामपंचायतीने करून घेतली. गृहकरही आकारण्यात आला आहे. मात्र मूळ शेतमालकाने संबंधित व्यक्तीला योग्य मोबदला न दिल्याने अनेकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांवर काहीतरी त्वरित तोडगा काढण्यात यावा अशी मागणी संबंधित नागरिक करीत असून काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे.
कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथील अरुण उद्धव भोगे यांनी कमलाबाई नानाजी किन्नाके यांच्या 25/1 या शेतातील जागा 2014 मध्ये 75 हजार रुपयांत घेतल्याचे स्टॅम्पवरून कळते. आता ही जागा आणि त्यांचे पक्के घर राष्ट्रीय महामार्गाकरिता संपादित करून मोबदला संबंधित शेतकऱ्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अरुण भोगे यांनी शेतमालक किन्नाके यांना त्यांच्या जागेचा आणि बांधकामाचा मोबदला मागितला. किन्नाके यांनी काही व्यक्तीला जागेबद्दल रक्कम परत केलीसुद्धा. मात्र भोगे यांचे घर असल्याने घराचा मोबदला देण्यास नकार मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. यात अडचण अशी की शेतीची मिळालेली एकरी रक्कम पाहता त्यांनी लोकांना घरासाठी विकलेली जागा अधिक किमतीची ठरते. म्हणून प्राप्त रकमेतून सर्वाना मोबदला देणे शक्य होत नाही.आणि बांधकामाचा तर मोबदलाच मिळाला नाही असे किन्नाके यांचे म्हणणे आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना मोबदला मिळावा ही मागणी स्वाभाविक असली तरी कायदा समोर करून शेतमालक टाळाटाळ करीत आहे. या वादाचा निपटारा कोणत्या पद्धतीने होतो, याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.