लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 25 डिसेंबर 2022मरणाअवस्थेत असलेल्या एका मुक्या प्राणाला जीवनदान देण्याचे कार्य शासकीय आरोग्य अधिकारी डॉ सोमनाथ भोजने यांनी केले आहे.नागाव मधील एका शेळीचे प्राण वाचवून डॉ सोमनाथ भोजने यांनी आपली माणुसकी दाखवली आहे.
शेतकरी प्रकाश म्हात्रे यांची ती शेळी होती.शेतकरी प्रकाश म्हात्रे, नागाव (उरण) येथील रहिवासी असुन त्यांनी सांगितले की मी बऱ्याच वर्षांपासुन शेळीपालन व्यवसाय करत आहे. या व्यवसायात शेळीपालन बाबत मार्गदर्शन, त्यांचे लसीकरण, उपचार व विविध शासकीय योजना यासाठी नेहमीच आम्हाला पशुवैद्यकीय डॉक्टरांची गरज भासते.
दिनांक 15/12/2022 रोजी माझी गाभण शेळीची डिलिव्हरी होत असताना पिंडाचा (करडाचा) एक पाय बाहेर आला होता. बऱ्याच वेळ जाऊनही पिंड बाहेर येत नव्हते व शेळीचा त्रास वाढत चालला होता. शेवटी मी उरण येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर सोमनाथ भोजने यांना फोन केला. त्यांनी त्वरित येऊन शेळीची तपासणी केली. औषधोपचार करून नॉर्मल डिलिव्हरी (नैसर्गिक प्रसुती) होण्यासाठी प्रयत्न केला. परंतु पिंड आडवे आल्याने व गर्भाशयातील पाणी वाहुन गेल्याने नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य नव्हते. त्यामुळे शेळीचे सीझर ऑपरेशन करण्याचे ठरविले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृत व सुकलेले पिंड बाहेर काढण्यात आले. शेळीवर योग्य तो उपचार झाल्याने शेळीचे प्राण वाचले. आता शेळीची तब्येत एकदम व्यवस्थित असुन ती खात पीत आहे. तिची तब्येत हळूहळू सुधारत आहे.शेळीचे प्राण वाचविल्याने शेतकरी प्रकाश म्हात्रे,उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष दत्ता म्हात्रे यांनी डॉ सोमनाथ भोजने यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.