लोकदर्शन वरोरा👉 *राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चुप्पी साधणाऱ्या व समृद्धीच्या नावाने बरबादी लादणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन व इतर संघटना मिळून हिवाळी अधिवेशनात नागपूर विधीमंडळावर शेतकरी शेतमजूरांच्या न्याय हक्कासाठी वणी ते नागपूर अशी पैदल संघर्ष दिंडी काढणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. नामदेव कन्नाके यांनी सुयोग हाँटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, सरकार कंपन्यांच्या फायद्याचे धोरण चालवितात. ओला दुष्काळाचा अहवाल तयार केला जात नाही, जंगली प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान व शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीचा अभाव आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच राज्यातील सत्ताधारी शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २१ डिसेंबरला वणी येथून सकाळी ६.०० वाजता पैदल मार्च नागपूर साठी निघणार आहे. गावागावांतील शेतकरी, शेतमजूर यात टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. २१ डिसेंबरला सायंकाळी ५.०० ते ८.०० वाजता दरम्यान वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात किसान सभेचे राज्य सचिव कॉ. राजन क्षीरसागर (परभणी), कॉं. अरुण बनकर ( अमरावती) यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभा होणार आहे. तद्नंतर २६ डिसेंबरला दिक्षा भूमी नागपूर येथून विधान भवनावर मोर्चा निघेल.
पुरग्रस्त व अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, गायरान धारकांच्या हक्कासाठी, वनजमीनिच्या पट्टयासाठी, लुटारू पिकविमा कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी, प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी व भुसंपादनाच्या रास्त पैशासाठी, विज हक्कासाठी व संपूर्ण वीजबिल माफीसाठी, वन्य पशुमुळे होणाऱ्या मनुष्यहानी व पीक हानीचा पूर्ण मोहबदला मिळावा आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, शेतमजूरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेत किसान सभेचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार, रतन भोसले उपस्थित होते.