By : Shankar Tadas
चंद्रपूर :
विवाहाची परिपूर्ण माहिती आणि निमंत्रण याकरिता वेगवेगळ्या पत्रिका छापून वाटल्या जातात. त्याकरिता मोठा खर्चही केला जातो. आपली पत्रिका लोकांच्या स्मरणात राहावी हा त्यामागे हेतू. मात्र, सामाजिक दृष्टी लाभलेले लोक आपल्या प्रत्येक कृतीतून वेगळेपण दाखवून देतात. चंद्रपूरच्या एका लग्नपत्रिकेत ऐतिहासिक वारसा चित्रित करून तो जपण्याचे आवाहन केले आहे.
सध्या चंद्रपूर शहरात समाज माध्यमातून ही विवाह पत्रिका वायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देणारी ही लग्नपत्रिका आगळीवेगळी असली तरी लग्न सोहळ्यात चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वैभव सांगणारी प्रतिकृती देखील आकर्षक ठरणार आहे. सुनील मिलाल असे या नवरदेवाचे नाव असून, हा विवाह सोहळा 17 डिसेंबर रोजी होत आहे.
सुनील मिलाल हा इको-प्रो या पर्यावरण प्रेमी संस्थेचा कार्यकर्ता असून, त्याने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यातूनच मिळालेल्या प्रेरणेतून त्याने आपल्या लग्न पत्रिकेत चंद्रपूर शहरातील सर्व ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी पत्रिकेमध्ये शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्न सोहळ्यात स्वागतासाठी चंद्रपूरच्या गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या परकोटाची कोरलेली प्रतिकृती राहणार आहे.
लोकपूर, इंदुपूर या गावापासून चांदा ते चंद्रपूर शहराच्या प्रवासात ऐतिहासिक वारसा निर्माण झाला. पुढे ब्रिटिश राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर तो जतन व्हावा, यासाठी प्रयत्न झाले. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सहकार्य करण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरांमध्ये प्राचीन आणि गोंडकालीन काळातील अनेक वास्तू आजही आहेत. त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी आपला वारसा आपणच जपूया ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची आज गरज आहे. हा संदेश नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पोहोचण्याच्या दृष्टीने पत्रिकेच्या रूपाने जनजागृती करण्याचा हा प्रयत्न अनोखा आहे.
ऐतिहासिक वारसा देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना घाण करू नका. स्मारकांना नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करा, ते सर्वात मौल्यवान वास्तु आहेत. आपल्या शहरातील ऐतिहासिक स्मारके आणि स्थळ आपल्या पूर्ण शक्तीने जतन करा. ऐतिहासिक वास्तु-वारसा ही राष्ट्राची शान आणि सामर्थ्य असते, असे आवाहन या पत्रिकेच्या माध्यमातून केले जात आहे.