लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील मौजा कोष्टाळा येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि उद्घाटक आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, काँगेस पक्षांचे दुप्पटे देऊन सर्वांना गौरविण्यात आले.
या प्रसंगी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू गाव आहे. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य म्हणून आता आपल्यावर जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्रित येऊन गावाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे. विकासासाठी सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही तुम्हाला करू. तुम्ही जनहिताच्या कामाला प्राधान्य द्या असे मत व्यक्त केले. तर आ. सुभाष धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गोरगरीब, जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणारा पक्ष आहे. आपण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. त्यामुळेच राजुरा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्कृष्ट कामगिरी करून १४ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच, १० ठिकाणी उपसरपंच आणि १०७ सदस्य निवडून आले आहेत आणि सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसचे प्राबल्य कायम ठेवले आहे. अर्थात यात स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. आता सर्वांनी गावातील विकासासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे. आवश्यक तेथे आमचे सहकार्य नेहमी असेल अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कविता उपरे, माजी जि प सदस्य अब्दुल हमीद अब्दुल गणी पटेल, मेघाताई नलगे, नानाजी आदे, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, अशोकराव देशपांडे, विधानसभा यु. काँ. अध्यक्ष मंगेश गुरणुले, यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सुरेश पावडे, पुर्णाचंद्र पेद्दी, प्रसाद मांडवा, गैस जाणी, गणपत जाभोर, सत्यपाल जाबोर, गोपाल कुंदाराम, यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी ऋषी बोरकुटे आणि भिमराव बंडी यांना लोकप्रिय खासदार आणि आमदारांच्या हस्ते काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन रामचंद्र जाभोर यांनी केले.