लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– कळमना येथे दोन गोठ्याला आग लागून मोठी हानी झाली होती. यात संसार उद्धवस्त झालेल्या सत्यपाल दादाजी गुरुनुले या शेतमजूर चे जीवनावश्यक वस्तू आणि मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले होते. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन कुणाच्याही मदतीची वाट न पाहता कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी स्वतः पुढाकार घेत गावातील नागरिकांना आवाहन केले आणि समस्त गावकरी बांधवांनीही हिरहिने पुढाकार घेत सत्यपालला मदतीचा हात दिला आहे.
आगीमुळे सत्यपाल च्या कुटुंबियांवरचे संकट दूर करण्यासाठी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, हनुमान मंदिराचे अध्यक्ष प्रभाकर साळवे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, ज्येष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेंडे, बंडु विरुटकर, महादेव ताजने, मारोती साळवे, मंगेशराव ताजने, साईनाथ पिपळशेंडे, अरुण आस्वले, महादेव वाढई, कवडु गौरकार आदींनी स्वतः पुढाकार घेऊन समस्त गावकर्यांना मदतीचे आवाहन केले. जनतेने प्रतिसाद देऊन ३८ हजार रुपये रोख रक्कम, ८ कट्टे तांदूळ, ४ कट्टे गहू , १ कट्टा चण्याची डाळ , १ कट्टा तुरीची डाळ, १ तेल पिपा, साखर, साड्या ,पॅन्ट ,शर्ट ,टावेल, चादर मुलांना कपडे, ब्लॅंकेट अशा जीवनावश्यक वस्तूंचे भरभरून मदत केली. आगीत मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी कळमना येथील सरपंच, अन्य जबाबदार नागरिक व सर्व गावकऱ्यांची धडपड पाहून सत्यपाल व त्याची पत्नी यांचे मन भरून आले असून त्यांनी समस्त गावकर्यांचे आभार मानले आहेत. गावातील एखाद्या व्यक्तीवर नैसर्गिक संकट कोसळले तर त्यांच्या पाठीशी समस्त गावकऱ्यांनी कसे उभे राहिले पाहिजे याचा आदर्श असा वस्तुपाठ कळमनावशीयांनी प्रस्थापित केला आहे.