लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी गावाकडे चला हा नारा दिला. गाव हे सगळ्या दृष्टीने समृद्ध झाले पाहिजे. गावाचा विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे अशी त्यांची भावना होती म्हणून त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. ग्रामीण भागातील राहणाऱ्या तळागाळातील माणसाला रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे व त्यांची दोन वेळाची जेवणाची सोय झाली पाहिजे म्हणून केंद्र शासनाने ही योजना सुरू केली. तात्कालीन सरकारने प्रामाणिकपणे काम केले परंतु यामध्ये थोडी सुधारणा होण्याची गरज आहे. शहरी विभागामध्ये नगरपरिषद, नगरपंचायत कडून शहराची रस्त्याची सार्वजनिक सभागृहाची चौकांची साफसफाई केली जाते. याच धर्तीवर मनरेग अंतर्गत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी चार मजूर लावण्याची व त्यांची मजूरी देण्यासाठी मनरेगा अंतर्गत व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करीत कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी देशाचे ग्रामविकास मंत्री, राज्याचे ग्राम विकास मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना याबाबत सकारात्मक विचार करून ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी आणि गरजू नागरिकांच्या रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत ही व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.