By : Avinash Poinkar
*गोंडपिंपरी येथे विदर्भस्तरीय मराठी कवी संमेलन
*जीवन गौरव साहित्य परिवार व शब्दांकुर फाउंडेशनचे आयोजन
चंद्रपूर :
समाजमाध्यमांतून रातोरात प्रसिद्धीस येणा-यांचे आपण गोडवे गातो. सेल्फीश भवतालात रममाण होतो. चित्रपट अभिनेतेच केवळ सेलिब्रिटी नव्हे तर समाजाला सजग करणारा साहित्यिक हा समाजातील खरा सेलिब्रिटी असतो, तो सेलिब्रिटी म्हणून गणल्या जावा असे मत गडचिरोलीचे गट विकास अधिकारी व साहित्यिक धनंजय साळवे यांनी व्यक्त केले. गोंडपिपरी येथील कुणबी सभागृहात उद्धव नारनवरे साहित्य मंचावर जीवन गौरव साहित्य परिवार व शब्दांकुर फाउंडेशन आयोजित विदर्भस्तरीय कवी संमेलन पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केले. स्वागताध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक चेतनसिंग गौर, श्रीकृष्ण अर्जुनकर, राजेश ठाकूर,कवी प्रवचनकार चेतन ठाकरे, रेखा कारेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी गोंडपिपरी येथील ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे यांचा साहित्य सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सध्याचे राजकीय वातावरण पक्षफोडीने गाजत आहे तर साहित्यक्षेत्रात कंपुगीरी माजत आहे. साहित्यातून समाजपरिवर्तनाचे काम साहित्यिकांनी करण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर यांनी केले. समाजाला जागरुक करण्याचे काम साहित्यिक करीत असतात, त्यांनाही समाजाने जपावे असे मत यावेळी सुधाकर अडबाले यांनी मांडले.
जीवन गौरव मासिकप्रणित जीवन गौरव साहित्य परिवारचे समूह निर्माता, सहसंपादक गणेश कुंभारे व शब्दांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष व सहसंपादक दुशांत निमकर यांनी या संमेलनाचे आयोजन करुन आदिवासीबहूल भागात साहित्यातून लोकजागर केला. कवी संमेलनात विदर्भासह राज्यभरातून कवी सहभागी झाले. कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या बहारदार संचालनाने रंगत आणली. अहमदनगरचे कवी रज्जाक शेख यांनी रसिकांचे डोळे पाणावणारी ‘जात्यामंधी बाप तुहा,पिठामंधी माय’ ही रचना सादर केली. यवतमाळचे कवी विजय ढाले ‘एकदा तरी बळीचे सरकार आले पाहिजे’ ही शेतकऱ्यांचा एल्गार पुकारणारी रचना सादर करून दाद मिळवली. अहमदनगरचे ग्रामीण कवी आनंदा साळवे यांनी सासू सुनेचे नातेसंबंध कवितेतून ग्रामीण शैलीत मांडले. कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘जंगलनोंदी’ तील आदिवासीच्या व्यथा वेदना रसिकांना अंतर्मुख करून गेल्या. विजय वाटेकर यांच्या उपरोधीक मुक्तछंदाने रसिक काही क्षण अस्वस्थ झाले. डॉ.किशोर कवठे, विनायक धानोरकर, विकास गजापुरे, रवींद्र गिमोणकर, राहुल पाटील, डॉ.हितेंद्र धोटे, चेतन ठाकरे, मारोती आरेवार, विरेन खोब्रागडे, राजेंद्र घोटकर, प्रवीण तुराणकर, नेताजी सोयाम, दिलीप पाटील यांनीही आपल्या रचनामधून ‘अंगार आणि शृंगार’ मांडला.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना जिरकुंठावार तर आभार शब्दांकुर फाऊंडेशनचे सचिव राजेश्वर अम्मावार यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी अर्चना धोटे,विलास टिकले, उमेन्द्र बिसेन, प्रा.भारत झाडे, किशोर चलाख, राकेश शेंडे, उषा निमकर, वृषाली जोशी, संभाशिव गावंडे, तानाजी अल्लीवार, सुशांत मुनगंटीवार, विघ्नेश्वर देशमुख, उज्ज्वल त्रिनगरीवार, सचिन दळवी, अरुण कुत्तरमारे, शितल आकोजवार, अमृता पोटदुखे, अश्रका कुमरे, रामेश्वर पातसे, राहुल पिंपळशेंडे, झुंगाजी कोरडे, हिरामण सिडाम, आनंद चौधरी, इंद्रपाल मडावी, उज्वला अल्लीवार, अनु व रेणू अम्मावार, देवानंद रामगिरकर यांनी परिश्रम घेतले.