लोकदर्शन 👉 राहुल खरात
*पुणे दि. 1-* रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणारे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यंदा ‘पुण्यात’ होणार आहे. संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अतिशय आगळ्या पद्धतीने नुकतेच करण्यात आले. शेतकरी कष्टकऱ्यांच्या राजा बळीराजाच्या उपस्थितीत आणि लेखणीच्या प्रतिकृतीचे टोकाला असलेली ज्ञानज्योत प्रज्वलित करून संमेलन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच झाले .
पालक संघाचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल करीम आत्तार व बळीराजा वेशभूषेत सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. दांडेकर पुला नजिक, साने गुरुजी स्मारक येथे रोज सायंकाळी संमेलन कामकाजासाठी हे कार्यालय कार्यरत असेल. या वेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक
चळवळीचे संस्थापक सदस्य धनाजी गुरव म्हणाले ” राबणाच्या कष्टकरी बहुजनांचे विचार, वेदना, सुख,आनंद, संस्कृतीच प्रतिनिधित्त्व करणारे हे संमेलन यावर्षी पुण्यात होत आहे. रयतेचे राजे शिवाजी यांनी ज्या पुण्याच्या भूमीची नांगरट केली. तेथे समता- बंधूभाव-न्यायाचा विचार झानेश्वर, तुकारामांनी अभंगातून मांडला. जोतीराव फुल्यांनी या विचारांची मशाल येथे उजळवली. त्याच पुण्याच्या भूमीत सन 2022 चे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन 10-11 डिसेंबर ला होत आहे. हे अतिशय रोमहर्षक तर आहेच शिवाय सदयस्थितीत मार्गदर्शक ठरणार आहे.” अत्तार, बळीराजाचा वेश धारण करणारे सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनीही विचार व्यक्त केले.
अत्तार व बळीराजाच्या हस्ते लेखणीच्या प्रतिकृतीच्या टोकाची ज्ञानज्योत प्रज्वलीत करण्यात आली. आणि अतिशय आगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या स्वागत समितीचे निमंत्रक, नीतिन पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी सत्यशोधक मानव कांबळे एडवोकेट झाकीर आत्तार राकेश नेवासकर अनिसचे पदाधिकारी श्रीपाद ललवाणी,भारतीय साम्यवादी पक्षाचे अरविंद जक्का , एडवोकेट मोहन वाडेकर, सत्यशोधिका आशा ढोक, नीरजकुमार कडू, आकाश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.