मोरबी : ‘खासगी ‘ मनमानीचे बळी !!

विशेष संपादकीय

पावसाने देशात सर्वत्र हाहाकार उडविल्यानंतर आता ऐन सणासुदीच्या आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये गुजरात राज्यातील मोरबी दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळत आहे. यात तब्बल 134 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामध्ये लहान बालकांची संख्या मोठी आहे. काहीही विशेष कारण नसताना किड्यामुंग्यासारखी माणसे मरत असतील तर आमच्या सार्वजनिक यंत्रणामधील दोष प्रकर्षाने जाणवणारा आहे. येथे ‘ओरेवा’ कंपनी या मोरबीच्या झुलता पूलचे संचालन करीत होती. 181 वर्षे जुना हा पूल दुरुस्तीनंतर चार दिवसापूर्वीच पूर्ववत सुरू झाला होता. स्थानिक वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली होती. त्यामुळे सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना माहिती होती. शहर प्रशासन मात्र  ओरेवा कंपनीने पूल सुरू करण्याची परवानगी घेतली नसल्याचे सांगते आहे. या अपघाताला कारणीभूत ठरवून 9 जण ताब्यात घेतले. त्यात तीन चौकीदार आणि तीन तिकीट विक्रेते, कंपनीचे दोन मॅनेजर  यांचा समावेश आहे. प्रश्नांचा भडीमार होतो आहे. पोलीस ओरेवाच्या मालकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होतो आहे. केंद्र आणि राज्याने आर्थिक मदत घोषित केली. राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकारणही तापेल. परंतु निव्वळ कमिशन किंवा स्वार्थ लक्षात घेऊन तकलादू कामे खपवून घेतली जातात. याला कोणत्याही पक्षाचे शासन अपवाद नाही. आपला गुन्हा मान्य करायला कोणीच तयार नाही.
काहीच दिवसांपूर्वी अमरनाथजवळ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जण मरण पावले. या  ठिकाणीही एका खाजगी संस्थेला जबाबदार धरून आपण मोकळे झालो. परंतु सार्वजनिक सेवा देणाऱ्या देशातील खासगी संस्था नेमताना आणि त्यांची जबाबदारी निश्चित करताना आपले धोरण किती काटेकोर आणि कठोर असते याची जाणीव सामान्य जनतेलाही पदोपदी येत आहे.
कोणताही मोठा अपघात झाला की तकलादू कारणे शोधून प्रकरण ‘मॅनेज’ केले जाते. मग या यंत्रणा पुन्हा नवीन अपघाताकरिता सज्ज असतात. लोक किड्यामुंग्यासारखे मरत असतात. मोठा आर्थिक मोबदला देऊन सांत्वन दिले जाते. परंतु ज्यांच्या चुकीने अशा घटना घडतात त्यांच्याकडून हा सर्व मोबदला वसुल केला जातो काय, हा प्रश्न आहे. रस्ते अपघातातात लाखो बळी आजवर गेले असतील. जनतेचे आर्थिक नुकसान तर अपरिमित म्हणावे लागेल. एकूणच एकमेकांवर दोषारोप करून प्रकरण शांत होते. जनता पुन्हा मरायला तयार असते नाईलाजाने. देशातील एकूण राजकारणाला  फक्त दोनच कर्तव्य असल्याचे स्पष्ट होते. विरोधकांनी सत्तेला खाली खेचावे आणि सत्ताधाऱ्यांनी आपली खुर्ची सांभाळण्यात शक्ती पणास लावावी. लोकशाहीतील नेत्यांचा हाच मुख्य खेळ जाणकार जनता मनोरंजन म्हणून पाहते आहे. सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्यात नसलेला हा मामला. राजकारणाच्या सोईकरिता विविध टाकावू मुद्दे निर्माण केले जातात. त्यावर खडाजंगी होते. आपणच जनतेचे अधिक वाली आहोत हे दाखविण्यासाठी आपल्या नेत्यांची चढाओढ सुरू असते. या रणकंदनात सामान्य माणसाचे प्रश्न तसेच कायम राहतात. मग त्याला भरभरून मोठी स्वप्न दाखविली जातात.  आता त्याच्या मूलभूत गरजा क्षुल्लक वाटू लागतात. म्हणून कोणतीही तक्रार न करता गप्प राहणे हेच आदर्श नागरिकाचे कर्तव्य वाटू लागते.  मोठया स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो आपल्या लहान स्वप्नांचा खुशाल बळी देतो.
******
शंकर तडस
संपादक
लोकदर्शन : सकारात्मक लोकजागार
9850232854

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *