अमराई वार्डातील संतप्त महिलांचा रस्त्यावर ठिय्या काँग्रेसचे आश्वासन हवेतच विरले

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील भुस्खलनग्रस्त संतप्त अमराई वार्डाच्या महिलांनी घटनास्थळाच्या रस्त्यावर बसून ठिय्या मांडला व काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली.

घुग्घुस येथे अमराई वार्डात २६ ऑगस्ट रोजी भुस्खलन होऊन गजानन मडावी यांचे घर शेकडो फूट जमिनीत धसले. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इतरत्र हलविण्यात आले होते.
घुग्घुस मधील संपूर्ण अमराई वार्डाच धोकादायक स्थितीत असल्याने या वस्तीचे पुनर्वसन अत्यंत आवश्यक असल्याने खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थित यावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीत आमदार प्रतिभाताई धानोरकर वेकोलिचे महाप्रबंधक आभा सिंग, तहसीलदार निलेश गौड, तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, ठाणेदार बबन पुसाटे, घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, माजी एससी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर, काँग्रेसचे अलीम शेख, रोशन दंतलवार, जावेद कुरेशी उपस्थित होते. या बैठकीत सहा महिन्यात शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून दिले जाईल तो पर्यंत नागरिकांना घरभाडे देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु दोन महिने लोटत असतांना घरभाडे देण्यात आले नाही, तसेच घरपट्टे व घरे बांधून देण्यात आली नाही त्यामुळे संतप्त महिलांनी रस्त्यावर बसून ठिय्या मांडला व काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली.
या ठिय्या आंदोलनात मोठया संख्येत वार्डवासिय सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here