लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 26 उरण तालुक्यासह सर्वच ठिकाणी वैश्विक महामारी कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. नवरात्रौत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती, मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. दोन वर्षांनंतर सण-उत्सव साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा तरुणाईचे आकर्षण असलेला दांडिया गरबाही नव्या तेजाने घुमणार आहे.
तालुका व शहरातील मंडळांकडून नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंडप उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून विविध प्रकारच्या डिझाईनच्या सजावटीही करण्यात आल्या आहेत. भाविकांमध्येही चैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. नवरात्रौत्सवात तरुणाईला गरबा, दांडियाचे विशेष आकर्षण असते. त्यासाठी परवानगी दिली असल्याने विविध मंडळे तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांबरोबरच नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गरब्यासाठी खास ऑर्केस्ट्रा, गायक, वाद्यवृंदासाठी आधीच बुकींग झाली आहे. तर दांडिया स्पर्धेतील बक्षिसे मिळविण्यासाठी ग्रुपची तयारी सुरू आहे. फॅन्सी दांडिया, विशेष कपडे, त्यावर सुसंगत ज्वेलरी उरणच्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एकूणच यंदाच्या नवरात्रौत्सवात प्रचंड उत्साह, जोश, जल्लोष अधिक प्रमाणात पहावयास मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.