लोकदर्शन👉 राहुल खरात
.. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या घाणंद हायस्कूल व प्रा . टी . ए . चव्हाण ज्युनिअर कॉलेज , घाणंद येथे नुकताच बहारदार कवीसंमेलनाचा व मनोरंजनातून प्रबोधन करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमासाठी आघाडीचे गझलकार सुधाकर इनामदार , सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक सुनील दबडे, मराठी साहित्याचे संशोधक व अभ्यासक डॉ. रामदास नाईकनवरे, प्रा संताजी देशमुख , घाणंद हायस्कूल व कॉलेजचे विद्यार्थी , घाणंद जि . प . प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते .
कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी सुधाकर इनामदार होते . यावेळी बोलताना इनामदार म्हणाले की, कविता म्हणजे अंतरातला जाळ , झानेशाची ओवी व तुकारामाचा टाळ असते . कविता डोळ्यातले प्रेम , काळजातली माया व कविच्या जगण्याचा पाया असते . इनामदार यांनी आपल्या भाषणात बिघडलेल्या भोवतालवर, व्यवस्थेवर व मानवी मानसिकतेवर भाष्य केले .
यावेळी सुनील दबडे यांनी शिक्षणाचा टिळा व सावित्रीची लेक या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . यावेळी बोलताना दबडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आपल्यातील सुप्त कलागुणांचा शोध घ्यावा व ते गुण अभ्यास सांभाळून, परिश्रम घेऊन जोपासावेत . यावेळी त्यांनी स्वानंद , मनोरंजन, व प्रबोधन हा कार्यक्रम करण्यामागे हेतू असल्याचे सांगितले .
यावेळी डॉ . रामदास नाईकनवरे यांनी बदलत्या कुटुंब व्यवस्थेवरची ‘ वेगळं रहायचाय मला ‘ व वेड्या कविच्या जिवाला चैन पडेना या कविता सादर करून सर्वांचे प्रबोधन केले .
प्रा संताजी देशमुख यांनी सोनू तुला सोन्याची माळ गं, ह्या गाण्याचं विडंबन सादर करून मुलांची करमणूक केली . मुंबई सारख्या ठिकाणी नवीन लग्न करून जाणाऱ्या मुलींचा कसा स्वप्नभंग होतो यावरची ‘ सून मेरी अमिना दिदी ‘ . ही कविता सादर करून समाजातील सुधारणा वादाचा पर्दाफाश केला .
या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला विद्यार्थी , शिक्षक , मुख्याध्यापक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला .