लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :- – लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने पुर्णत्वास आलेल्या राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील अनुक्रमे विरूर स्टेशन, नांदा, भंगाराम तळोधी व शेणगाव या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण तत्कालीन आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते दि. ३१ मे २०२२ ला ऑनलाईन झाले होते. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे विधानसभा क्षेत्रात तात्काळ आरोग्य सेवा द्या, जिवती येथे स्वतंत्र तालुका आरोग्य अधिकारी व अन्य पदे निर्माण करा अशी मागणी केली होती. त्याला यश आले असून आरोग्य मंत्रालयाने दखल घेऊन दिनांक २३ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिवती येथे तालुका आरोग्य अधिकारी गट अ, कनिष्ठ लिपिक आणि पुरुष परिचर असे एकुण ३ पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.
आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने आता जिवती तालुक्याला स्वतंत्र तालुका वैद्यकिय अधिकारी पद मिळाल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहे.