लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 18 सप्टेंबर आगरी समाजाचे भूषण असलेले हास्य प्रबोधनकार, उत्तम लेखक, उत्तम कवी, एक उत्कृष्ट मोटिवेशनल इंडस्ट्रीअल ट्रेनर, तसेच आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनचे संस्थापक म्हणून सुपरिचित असलेले उरणचे सुपुत्र संजीवन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनची सभा शिळ फाटा हॉटेल कोकण किंग, कल्याण मुंबई येथे शनिवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. चला उद्योजक घडवूया असे अनेक उद्दिष्ट ठेऊन भरविलेल्या सभेची सुरवात श्री गणेश पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्याच बरोबर दीप प्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित विविध उद्योजकांचे परिचय घेऊन उद्योजकांचे असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आले. आगरी कोळी कराडी समाज एकत्र येऊन नवीन उद्योजक घडले पाहिजे त्याच बरोबर उपस्थित वऱ्हाडी मिसळचे संस्थापक मनोहर पाटील यांनी शून्यातून केलेल्या प्रवासातून त्यांनी 40 फ्रॅन्चायझी पर्यंत कसा प्रवास केला याचे अनुभव सर्वांना सांगितले. भविष्यात हॉटेल ताजमध्ये आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनची सभा भरवून आणण्याचे उराशी स्वप्न बाळगणारे संस्थापक संजीवन म्हात्रे यांनी उद्योजकांना येणार्या विविध अडचणींवर मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील स्थानिक समाजातील उद्योजकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक कर्ज स्वरूपी मदत करण्यासाठी बँक सज्ज असल्याचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि माजी अध्यक्ष बाबाजी बाळाराम पाटील यांनी हमी देत सांगितले. यापुढे आपले कार्यक्षेत्र संपूर्ण कोकण मध्ये सर्व तालुक्यात असेल अशी घोषणा आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष संजीवन म्हात्रे यांनी केली.यावेळी रायगड जिल्हा, नवी मुंबई, मुंबई मधील तसेच उरण तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.