लोकदर्शन👉 मोहन भारती
आमदार सुभाष धोटेंनी विधिमंडळात उपस्थित केला औचित्याचा मुद्दा.
राजुरा (ता.प्र) :– “राज्यातील तालुका-गोंडपिपरी, जिल्हा-चंद्रपूर स्थित तोहगांव येथे मोठ्या प्रमाणात पशुधनाची संख्या असून बऱ्याच नागरिकांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेती पिके तर गेलीच पण सोबतच उपचाराअभावी आपले पशुधन गमावण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगांवात श्रेणी-1 पशुचिकित्सालय असून कर्मचारी अभावी कित्येक दिवसांपासून कुलूपबंद अवस्थेत आहे. येथे 1 डॉक्टर, 2 परिचर, 1 पट्टीबंधक अशी कर्मचारी संख्या मंजूर आहे परंतु 3 वर्षांपासून कायम स्वरूपी डॉक्टर आणि 2 परिचर पदे रिक्त आहेत. जर कोणता आणीबाणीचा प्रसंग उदभवला तर हॉस्पिटलची सद्याची अवस्था अत्यंत बिकट होऊ शकते. सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक पट्टीबंधक आजपर्यंत चिकित्सालयाचा सांभाळ करीत होता परंतु तो अलिकडेच सेवानिवृत्त झाल्याने सदरहू चिकित्सालयाचा कारभार रामभरोसे आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही विदारक परिस्थिती अनुभवायला येत आहे.
याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा मतदार संघातील समस्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून देत क्षेत्रातील पशुवैद्यकीय चिकित्सालयातील रिक्त पदे तात्काळ भरुन कायमस्वरूपी डॉक्टर, परिचर, पट्टीबंधक नियुक्त करण्यात यावा तसेच सर्व आवश्यक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश शासनामार्फत तातडीने दिले जावेत अशी मागणी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत शासनास केली आहे.