लोकदर्शन👉 डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध
काय करावे सांगा आता जीवन आमचे युद्ध
संसाराचा गाडा आमुचा खेचून खेचून थकलो
जीर्ण शरीर हे काम करेना लाचारीने झुकलो
आशा वेडी आयते बसुनी दोनच घास गिळावे
पोरं म्हणती बाबा तुमचे घबाड मला मिळावे
अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध
काय करावे सांगा आता जीवन झाले युद्ध
राग जरासा दिसतो मजला सुनबाईच्या डोळी
ताट वाढता कळते मजला जळली थोडी पोळी
हाय हॅलो करतो नातू कधी कधी मज दिसतो
भेट घडावी त्याची माझी आस लावुनी बसतो
अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध
काय करावे सांगा आता जीवन झाले युद्ध
गावी जावे म्हणूनी मुलगा आस्थेने विचारी
तिकीट काढुनी बसवुनी देतो गाडीला रविवारी
मुलगी येते माहेराला रडत रडत मज म्हणते
सेवा बाबा जमणे नाही संसार सुखाचा करते
अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध
काय करावे सांगा आता जीवन आमचे युद्ध
लुकलुकत्या डोळ्यांनी बघते रागाने म्हातारी
थरथरत्या हातांनी उरकी अलगद कामे सारी
वैकुंठाची वाट पाहता सदा नव्याने जगतो
मरणाच्या दारावर असता दिवस उद्याचा बघतो
अडगळ झाली आज आमची आम्ही झालो वृद्ध
काय करावे सांगा आता जीवन आमचे युद्ध
डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे