लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २८ जुलै
जे.एन. पी. ए. मधील कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स च्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जे. एन. पी. ए. प्रशासन अत्यंत जलद गतीने कार्यरत होऊन कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पगार वाढीचा करार जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटने सोबत २६ जुलै रोजी जे. एन. पी. ए. प्रशासन भवन येथे संपन्न झाला.
गेली २७ महिने ९५० कामगारांचा प्रलंबित असलेला पगार वाढीचा प्रश्न जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटने ऐरणीवर आणला. २९ जुलै २०२२ पासून काम बंद आंदोलनाची नोटीस प्रशासनाला दिली होती त्यामुळे प्रशासन हादरले. २६ जुलै रोजी जे. एन. पी. ए. चेअरमन संजीव सेठी यांनी पगार वाढीच्या प्रस्तावावर सही करून २७ जुलै ला पगार वाढीचा करार जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटने सोबत करावा अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे २७ जुलै रोजी वेतन वाढीच्या करारावर जे. एन. पी. टी. जनरल कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, सरचिटणीस जनार्दन बंडा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने मुख्य व्यस्थापक जयंत ढवळे, व्यवस्थापक मनीषा जाधव, एस. एस. पगारे, संतोष मोरे हे अधिकारी उपस्थित होते.
या नवीन वेतन करारामुळे कामगारांना किमान वेतन रुपये २३,५७० व कमाल वेतन रुपये ३३,७६० मिळणार आहे. यापूर्वी कामगारांना राज्य सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळत होते परंतु या करारामध्ये केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळणार आहे, तसेच यापूर्वी न मिळणारी ग्रच्युइटी, ८.३३% बोनस, मेडीक्लेम सुविधा यांचा नव्याने समावेश झाला आहे याचे सारे श्रेय समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा याकरिता कायम प्रयत्नशील असणाऱ्या दमदार आमदार महेश बालदी यांचे आहे असे सुधीर घरत यांनी सांगितले.
नवीन वेतन करार संपन्न व्हावा याकरिता अत्यंत महत्वाची भूमिका आमदार महेश बालदी यांनी निभावली. त्यामुळे आ. महेश बालदी तसेच जे. एन. पी. ए. चेयरमन संजीव सेठी , व्हाईस चेयरमन उन्मेष वाघ, मुख्य व्यस्थापक जयंत ढवळे यांचे आभार सुरेश पाटील यांनी मानले आहेत.संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या वेतन कराराबद्दल सर्वच स्तरातुन व कामगार वर्गातून कामगार नेते सुधीर घरत व सुरेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोट (चौकट ):-
नवीन वेतन करार हा फक्त आमच्या संघर्षाचा विजय असून कुणीही फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
– सुधीर घरत
नवीन वेतन करार हा भारतीय मजदूर संघाच्या विचारांना अनुसरून वागणाऱ्या कामगारांच्या एकतेचा विजय आहे.
– सुरेश पाटील