लोलदर्शन 👉डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मोबाईल क्र.९६१९५३६४४१
संगणकीय युगात माहिती घेण्याचे व देण्याचे प्रभावी भाषा माध्यम इंग्रजी.आपण महाराष्ट्रात राहतो पण तरीही आज महाराष्ट्रात मराठी शाळांची परिस्थिती दयनीय झाली आहे.विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आणि इंग्रजीकडे असलेला ओढा यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.बऱ्याच शाळेतील शिक्षक विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे अतिरिक्त ठरवले जातात. काय बरं कारण आहे ? का बरे मराठीला स्थान नाही? त्याचे प्रमुख कारण जागतिक स्तरावर इंग्रजीचा गौरव आहे.
आपण मराठी माध्यमात शिकलो.महाविद्यालयात जेव्हा आपण शिक्षण घेण्यास गेलो.तेव्हा इंग्रजीतून शिकण्यासाठी योग्य मार्गदर्शन, विषय आवड नसल्याने पाय पाठी घ्यावा लागला. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी किंवा इतर काही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये देखील इंग्रजीला सामोरे जावे लागते.याचा परिणाम पालकांना वाटते मी कसेतरी जीवन काढले पण, माझ्या मुलाला इंग्रजी अस्खलित बोलता यावे. इंग्रजी शाळेत जाऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. जेणेकरून जे हाल मला सहन करावे लागले ते पाल्याला सहन करावे लागू नयेत.घरात दोन वेळचे जेवण कमी पडत असले तरी चालेल पण आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात घालायचे असा पक्का निर्धार प्रत्येक पालक करताना दिसत आहे.
घरात मातृभाषेचा तर परिसरात राष्ट्र भाषेचा वापर दिसतो, शाळेत इंग्रजीचा वापर.त्यामुळे विद्यार्थ्याची कोंडी होते.पालक सुशिक्षित असतील तर थोड्या प्रमाणात इंग्रजीचा परिचय असतो. जर पालक तळागळातील, अशिक्षित तर मात्र त्या मुलाची दैना उडते. शाळेत त्याच्याशी फाडफाड इंग्रजी बोलले जाते. ते ऐकत असतं. पण बऱ्याच गोष्टी त्याला आकलन होत नाहीत. घोकंपट्टी करुन ते लक्षात ठेवते. त्यात शब्दरचना, व्याकरण, शब्दसंपत्ती या भाषिक मौलिकतेला ते दुरावते.
त्याच्या कल्पनाशक्तीवर मर्यादा येतात. परकीय भाषेला जवळ करताना कुठेतरी त्याची फजिती नक्कीच होते. एखादे पत्र लिहिणे, मत मांडणे, दिलेल्या विषयावर स्व कल्पनेतून चार शब्द बोलणे. त्याला कठीण होऊन बसते. इंग्रजीतून बोलण्याचा अट्टाहास, भय, मर्यादित शब्द संपत्ती, चूक झाली तर सगळे हसतील ते शांत राहते. मराठी तर पुरेशा प्रमाणात येतच नाही. काना, मात्रा, वेलांटीच्या चुका लेखनात असतात.बोलताना लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय यांची दाणादाण उडते.भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप अशा अनेक आधुनिक साधनांचा वापर करताना इंग्रजी शिवाय पर्यायच राहिला नाही.आजची मुलं टंकलेखन करतानाही मराठी वक्तव्याचे इंग्रजीत टंकलेखन करतात.खरंच मराठीचा विसर पडला आहे.
डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मोबाईल क्र.९६१९५३६४४१