लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती चंद्रपूर जिल्हयात सुध्दा निर्माण झाली आहे. जिल्हयातील जवळपास सर्व तालुक्यांमध्ये पुरस्थिती गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईहून झुमच्या माध्यमातुन अनेक बैठका घेवून यावर उपाययोजना करण्यास सांगीतले, परंतु एक जागृत लोकप्रतीनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आ. मुनगंटीवार आहेत. आज आ. मुनगंटीवार तातडीने मुंबईहून नागपूरला आले व तडक वरोरा तालुक्यातील अनेक गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.
वरोरा शहरातील साई मंगल कार्यालयात वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या भेटी याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी घेतल्या व त्यांच्या समस्या समजून घेतल्या व अधिकारी व पदाधिका-यांना त्यावर त्वरीत उपाययोजना करण्यास सांगीतले. माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली व त्यांच्या चमुने यासर्व नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देवून त्यांना योग्य ती मदत करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. त्यानंतर कुचना गावाला भेट दिली असता तेथील प्राथमिक शाळेत पळसगांवचे १२१ नागरिक व थोरानाचे ४७ नागरिक वास्तव्यास असल्याचे लक्षात आले. तिथे प्राथमिकरित्या जेवण न मिळण्याची समस्या असल्याचे लक्षात आले. त्यावर या नागरिकांना धान्य देण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी व तहसलिदार यांना दिले. पळसगांवला वेकोलिच्या ओबीमुळे गावात पाणी घुसले असा आरोप तेथील नागरिकांनी केला. वेकोलिचे अधिकारी अशा पुरस्थितीत नागरिकांना कुठलीही मदत करीत नाही असे सुध्दा नागरिकांनी सांगीतले. पिण्याच्या पाण्याची स्थिती सुध्दा खराब असल्याचे नागरिकांनी सांगीतले. त्यावर आ. मुनगंटीवार यांनी ताबडतोब वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधक यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करण्यास सांगीतले.
त्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी पाटाळा या गावाला भेट दिली. हे गांव पूर्णतः पुराच्या तडाख्यात सापडले आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. त्याकरिता मजिप्राला याची माहिती देवून नविन अंदाजपत्रक तयार करावयास सांगावे असे आ. मुनगंटीवार यांनी पदाधिका-यांना सांगीतले. या गावात लाईट सुध्दा बंद आहे व पुढील अनेक दिवस येणार नाहीत अशी माहिती आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरच्या माध्यमातुन होत आहे. गावातील नविन पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी सांगीतले. त्यामध्ये फ्लाय अॅश वापरली गेली आहे जी पुरामुळे शेतांमध्ये वाहून आली. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. अशा कंत्राटदाराला बोलावून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले. गावातील लोकांची जेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी पदाधिका-यांना दिले.
त्यानंतर कोंढा फाटा येथे भेट दिल्यावर संपूर्ण गाव चारही बाजुंनी पाण्याचे वेढले आहे असे दिसले. या गावातील ५०० पैकी १०० घरांमध्ये पाणी घुसले आहे. गावात जायचे असल्यास एक किमी अंतर बोटीने पार पाडावे लागते. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून कॅनने पाणी पुरवावे असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. त्यानंतर बेलसनी गावाला भेट दिली असता त्या गावाचा संपूर्ण संपर्क तुटला असल्याचे लक्षात आले. गावाजवळून वाहणारा नाला हा नदीमध्ये रूपांतरीत झाला असून अतिशय वेगाने पाणी वाहत आहे. याठिकाणी मोठा पुल बांधणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी सांगीतले. इथे सुध्दा वेकोलिच्या ओबीचा प्रॉब्लेम असल्याचे लक्षात आले. या पुरामुळे शेतीतील संपूर्ण खत वाहून गेले असून शेतीची जमीन खरवडून गेली आहे. यावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन जमीन दुरूस्त करावी अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना केले.
त्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांशी बोलून यासर्व गावांमध्ये चा-याची व्यवस्था त्वरीत करण्याची सुचना केली. तसेच प्रत्येक कुटूंबाला नियमानुसार धान्य देण्याची सुचना सुध्दा त्यांनी केली. ज्यांच्या घरात पुराचे पाणी गेले आहे अशा कुटूंबांना ताबडतोब मदत म्हणून १० हजार रूपये देवू शकतो काय याची चौकशी करण्याचे निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिले. दौ-याचा शेवट घुग्गुस शहरात झाला. जिथे कार्यकर्त्यांनी उत्साहात आ. मुनगंटीवार यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या दौ-यात आ. मुनगंटीवार यांच्यासोबत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा सरचिटणीस नामदेव डाहूले, वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी जि.प. सदस्य नरेंद्र जिवतोडे, बाबाभाऊ भागडे, उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. आयुष नोपानी, विवेक बोढे, विनोद चौधरी, नितुताई चौधरी, अमित गुंडावार, प्रविण सुर, मनोज तिखट, सुचिता ताजने, मंगेश महातळे, संदीप एकरे, पांडूरंग आगलावे, प्रदिप मांडवकर, शंकर विधाते, भारत मोहीतकर व त्या त्या गावातील नागरिक उपस्थित होते.