लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 20जुलै भारतीय मजदुर संघाचा अखिल भारतीय पाच दिवसांचा विविध महासंघांच्या प्रमुख पराशरदात्री पदाधिकाऱ्यांचा अभ्यास वर्ग 13 ते 17 जुलै दरम्यान डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या मधुकर भवन,रेशीम बाग, नागपूर मध्ये संपन्न झाला. या आखिल भारतीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्य मय पंड्या यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन,राष्ट्रीय महामंत्री बी.के. सिन्हा ,राष्ट्रीय मंत्री रवींद्र हिमते ,नीलिमा चिमोटे, सुरेंद्र पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा नीता चौबे, जयंतीलाल, राष्ट्रीय नेते अण्णा धुमाळ, पोर्ट महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील, कोषाध्यक्ष सुधीर घरत, विदर्भ प्रदेशाध्यक्षा शिल्पा देशपांडे, कोयला खदान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष टिकेश्वर सिंग,महामंत्री सुधीर घुरटे यांच्यासह या अभ्यास वर्गात भारतातील सर्व राज्यातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या केंद्र सरकार व राज्य सरकारमधील विविध उद्योगातील संघटनांचे अखिल भारतीय अध्यक्ष, महामंत्री, संघटन मंत्री, कोषाध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय पोर्ट महासंघाचे महामंत्री सुरेश पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करताना सुरेश पाटील म्हणाले की केवळ भारतीय मजदूर संघ ही अशी एकमेव ट्रेड युनियन आहे जी अशा प्रकारच्या अभ्यास वर्गाचे वर्षभर संपूर्ण देशभर आयोजन करीत असते. मी भारतीय मजूर संघात बऱ्याच दिवसापासून- वर्षापासून काम करीत आहे.त्यामुळे मला अभ्यासाची आवश्यकता नाही असे या संघटनेत चालत नाही. माणसाचे शरीर चालण्यासाठी ज्या प्रकारे भोजनाची आवश्यकता असते. त्या प्रकारे बुद्धीचा व आपल्या कार्याचा विस्तार करण्याकरता सतत अभ्यास वर्गाची आवश्यकता असते. उदाहरण देताना सुरेश पाटील यांनी सांगितले की पितळाला सतत सोन्यासारखे चमकते ठेवण्यासाठी जसे व्यंगण करावे लागते. तसेच संघटनेला कार्यशील ठेवण्याकरिता अशा प्रकारचा अभ्यास वर्गाची आवश्यकता असते.म्हणून भारतीय मजदुर संघाच्या स्थापने पासून दत्तोपंत ठेंगडी यांनी अभ्यास वर्गाला विशेष महत्त्व दिले आहे.पाच दिवस चाललेल्या या अभ्यास वर्गामध्ये 32 महासंघ आणि 124 सुकानु समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.या अभ्यास वर्गात भारतीय मजदूर संघाची संघटना संस्कृती, मौलिक सिद्धांत ,लेबर कोर्ट, नवीन लेबर कोर्ट वर्तमान व आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक मूल्य आणि कुटुंब व्यवस्था परिवर्तन व कामगार इत्यादी संबंधी अन्य विषयावर मार्गदर्शन झाले.