लोकदर्शन 👉 शुभम शंकर
पेडामकर
माझ्या घरापासुन अगदी १० मिनिटांच्या अंतरावर तू आहेस तरी तुला भेटण्याची हुरहुर कधीचं नव्हती पण आज तुला भेटण्याचा मोह मला काही आवरता आला नाही. इकडे आल्यावर मला जाणवलं की तू सर्वांसाठी आहेस पण तुझ्यासाठी असं तुझं कुणीचं नाही. तू प्रत्येकाचे क्षण जगतोस पण तुला “तुझा” असा क्षण नाही.
सुख-दुःखाचे वाहते पाणी उधळून तर तू लावतोस खरं
पण त्या पाण्याला खारटपणा देखील आहे हे विसरून मात्र चालणार नाही. तू निखळ आहेस, तू शांत आहेस आणि ज्याला जसा हवा तसा तू होणारा आहेस. म्हणूनच तर तू प्रत्येकाला हवाहवासा वाटतोस.
बघायलं गेलं तर तुझ्यात वेगळेपणाच्या अनेक छटा आहेत पण त्यातील एक छटा मला फार आवडते ती म्हणजे कधीच तू तुझ्या उदरात काहीच साठवून ठेवत नाहीस सर्व काही किनाऱ्यावर अलगदपणे आणून ठेवतोस आणि ही गोष्ट फक्त तुलाच जमते याचं आश्चर्य आहे.
असो! पुन्हा तुझ्यासोबत एक विसावा घ्यायचा आहे सर्वकाही बाजूला ठेऊन तेव्हा मात्र तू मला साद घालशील ही अपेक्षा आहे.
©शुभम शंकर पेडामकर