लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*अमरावती येथे व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांची बैठक संपन्न.*
ज्यांच्या आधारावर देशाची अर्थव्यवस्था आहे, देशाच्या विकासाला हातभार लावण्याची जबाबदारी आहे अशा व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट बांधवांच्या समस्यांबाबत मी विधानसभागृहाच्या माध्यमातुन शासनाचे लक्ष वेधले आहे. अर्थमंत्री असताना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी कितीही जोमाने योजना केली तरीही आपण त्यासंदर्भात हातभार लावला नाही, काहीही केले नाही तर त्या योजनेचा निश्चीतच उपयोग नाही. ५ ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी व्हावी म्हणून आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहे, असे आवाहनवजा प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १९ जून २०२२ रोजी अमरावती येथे व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एक राष्ट्र, एक बाजारपेठ, एक करप्रणाली ही जीएसटी आणण्यामागे मुळ कल्पना होती. २८ टक्के जीएसटी संदर्भात आपण जो मुद्दा सांगीतला तो कमी करण्यासाठी मी निश्चीतपणे प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण ज्या समस्या, प्रश्न मांडले त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी निश्चीतपणे प्रयत्न करेन व आपणही त्यांचा पाठपुरावा करावा, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी भाजपा अमरावती महानगर जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे सुरेश जैन, सातुर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विरेंद्र लढ्ढा, बिझी लॅंड मार्केटचे जयराज बजाज, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता सुरेंद्र पोपली, व्यापारी आघाडी अध्यक्ष सारंग राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट यांनी आपल्या समस्या व प्रश्न विस्ताराने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडले. या बैठकीला भाजपा उद्योग आघाडीचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.