-
By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
*’महानिर्मिती’ला उल्लेखनीय यश
नागपूर : राज्यात तीव्र उन्हाळा जाणवत असताना व राज्याची विजेची मागणी २७ हजार मेगावॅटपेक्षा जास्त असताना महानिर्मितीने आज 18 मे रोजी पुन्हा एकदा औष्णिक वीजनिर्मितीत ८ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. आज दुपारी ३.१५ वाजता महानिर्मितीने ८,०४५ मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीसह एकूण ९,९५२ मेगावॅट वीजनिर्मिती साध्य करून राज्यातील वीजग्राहकांना मोठा दिलासा दिलेला आहे. यावेळी चंद्रपूर महाऔ.वि. केंद्रातील २,२१६ मेगावॅट, कोराडी औ.वि. केंद्रातील १,७४९ मेगावॅट, खापरखेडा औ.वि. केंद्रातील १,०२६ मेगावॅट, भुसावळ औ.वि. केंद्रातील १,०७८ मेगावॅट, परळी औ.वि. केंद्रातील ५१२ मेगावॅट, नाशिक औ.वि. केंद्रातील ४७५ मेगावॅट, व पारस औ.वि. केंद्रातील ३९३ मेगावॅट अशी वीजनिर्मिती साध्य झाली.
गेल्या सुमारे २ महिन्यांपासून महानिर्मितीने अतिशय सातत्याने उच्चतम कामगिरी नोंदवित वीजनिर्मितीत अनेक उच्चांक नोंदविले आहेत. मुख्य म्हणजे उत्तम कार्यसंस्कृतीच्या माध्यमातून एकूण २७ औष्णिक संचांची उपलब्धतता १००% राहील, याकडे कटाक्षाने लक्ष दिल्याने तसेच कोळसा टंचाईच्या परिस्थितीतदेखील प्रभावी इंधन व्यवस्थापन केल्याने ही विक्रमी कामगिरी शक्य झालेली आहे. राज्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मा.ना. मुख्यमंत्री तसेच मा.ना. ऊर्जा मंत्री यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महानिर्मितीने मिशन ८,००० मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.
महानिर्मितीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल मा. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे, सर्व संचालक मंडळ व महानिर्मितीचे सर्व अभियंते-तंत्रज्ञ-कर्मचारी यांचे पुनःश्च अभिनंदन केले आहे.