By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
*बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर दि.१६ मे :- वैशाख पौर्णिमेला महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण देखील झाले. म्हणूनच संबंध जगासाठी हे बुद्धपर्व आहे. आज बुद्ध पोर्णिमा निमित्त दीक्षाभूमी येथे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दिक्षाभूमी धम्म अनुयायांनी गजबजली होती. सकाळपासूनच लोकांनी दिक्षाभूमी येथे गर्दी केली होती. बुद्ध पोर्णिमा नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरी झाली. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारांमध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्रम झाला.
या प्रसंगी दिक्षाभूमी येथे जिल्हाधिकारी आर. विमला, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. सुधीर फुलझेले, शिवदास वासे आदी उपस्थित होते.
*इंदोरा बुद्धविहार येथे भेट*
दिक्षाभूमी येथे वंदन करुन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंदोरा बुद्धविहाराला भेट दिली. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करुन विहारातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रसंगी विहार समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.