◆ग्राहकांना महावितरणाचा ‘शॉक’
◆उरण मधील नागरिक वीज बिलांमुळे हैराण.
लोकदर्शनउरण 👉(विठ्ठल ममताबादे ) .
दि 23 एप्रिल। सर्वसाधारणपणे नागरिकांना महावितरण या वीज कंपनी तर्फे एका महिन्याचे एकच वीज बिल येत असते. मात्र चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रत्येक ग्राहकाला महावितरण तर्फे दोन वीज बिल देण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. एक नियमित (रेग्युलर )वीज बिल आहे तर दुसरे अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल आहे. हे दोन्ही वीज बिले एकाच वेळी नागरिकांना मिळाल्याने उरण तालुक्यातील वीज ग्राहक संतप्त झाले आहेत.आता हे रेग्युलर वीज बिल व दुसरे बिल अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल आता कसे भरायचे, पैसे कुठून आणायचे या विवंचनेत सर्वसामान्य माणूस सापडला आहे. महागाईत सर्वात मोठा झटका वीज बिलांचा सर्वसामान्य ग्राहकांना बसल्याने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून महावितरण कपंनीने ग्राहकांना एकप्रकारे शॉकच दिला आहे.
कोरोनामुळे नागरिकांच्या घरची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. त्यातच महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आर्थिक घडी अजूनही व्यवस्थित बसलेली नसताना अचानक महावितरण कपंनीने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून ग्राहकांचे कंबरडेच मोडले आहे. एक बिल रेग्युलर आहे तर दुसरे वीज बिल सुरक्षा रकमेच्या नावाखाली देण्यात आलेले आहे. मात्र सुरक्षा रकमेच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रुपये महावितरण ग्राहकांकडून वसुल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोरोना संपतो न संपतो तोच महागाईने डोके वर काढले आहे. महागाईला कंटाळून गेलेल्या नागरिकांना वीज बिलांचा शॉक बसल्याने नागरिक पूर्णपणे कंटाळले असून महावितरणाच्या कारभारावर नागरिक नाराज आहेत. अगोदरच महावितरण वीज विक्रीकर, स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार,इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, आदी भरमसाठ आकार(कर)महावितरण वीज बिलांच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारत आहे. आता तर दोन बिले मिळाल्याने नागरिकांना एकच जोरात शॉक बसला आहे.
वीज बिल नाही भरले तर वीज तोडण्यात येईल असे महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांना सांगण्यात येते. त्यामुळे वीज ग्राहक घाबरून वीज बिले भरत आहेत. तर अनेक ग्राहकांचे मीटर बंद असूनही त्यांच्या माथी सरासरी वीज बिल मारण्यात आले आहे. नवीन मीटर उपलब्ध करून मीटर बदलून देण्याची मागणी केली असता तेही वेळेत उपलब्ध होत नसल्याने महावितरण ग्राहक या सर्व गैर सुविधेमुळे पूर्णपणे वैतागला आहे.
कोट(चौकट):-महावितरण तर्फे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास दिले जात नाही.प्रत्येक नागरिकांनी दोन्ही वीज बिले भरून महावितरनाला सहकार्य करावे. एक रेग्युलर वीज बिल असून दुसरे सुरक्षा अनामत रक्कम असे दोन्ही वीज बिले भरणे नागरिकांना अनिवार्य आहे. वीज ग्राहकांच्या वापरा नुसार महिन्याचे वार्षिक सरासरी अंदाजे बिल काढले जाते. ज्यांचे वीज वापराचे युनिट अधिक आहे अशा सरासरी वीज बिलावर अनामत रक्कम निश्चित केली जाते. ही रक्कम नियमानुसार महावितरण कडे सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने अनामत रक्कम भरून महावितरणाला सहकार्य करावे. प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यात हे सुरक्षा अनामत रकमेचे बिल ग्राहकांना दिले जाते. वर्षातून एकदाच ही सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते. आम्ही अगोदर वीज देतो नंतर वीज बिल देतो.त्यामुळे ही सुरक्षा अनामत रक्कम अगोदरच ग्राहकांनी बिलाद्वारे भरावे. त्यांना नंतर कोणतेही अडचण येणार नाही.
-विजय सोनवले
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उरण.