*युवक काँग्रेस शक्तिप्रदर्शन करणार*
मुंबई, दि.२१ एप्रिल २०२२
By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत २३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता टिळक काँग्रेस भवन येथे आपल्या पदाची औपचारिक सूत्रे हाती घेणार आहेत. त्यानंतर दादर येथील कामगार कल्याण क्रीडा मंडळाच्या मैदानावर भव्य पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाविकास आघाडी सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, मत्स्यविकास व बंदरे मंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, या पदग्रहण सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रेल्वे, बस, चारचाकी, दुचाकीने मुंबईत धडकणार आहेत. यामाध्यमातून युवक काँग्रेसचे जणू जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य संचारले आहे.
आगामी काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने “गाव तिथे शाखा” हा प्रमुख कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यानुसार सुमारे ४५ हजार गावांमध्ये शाखा उघडण्यात येणार आहे. या शाखांमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविणार आहेत.
या उपक्रमात गावांमधील नागरिकांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आगामी काळात देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य विषयावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी विजय सिंग राजू यांनी दिली. केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी देण्याचा युवक काँगेसचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, अनिकेत म्हात्रे, प्रशांत ओगले, सोनलक्ष्मी घाग, तन्वीर विद्रोही सरचिटणीस दीपाली ससाणे आदी उपस्थित होते.