लोकदर्शन 👉 राहुल खरात
एकोणिसाव्या शतकात संपूर्ण समाज हा जातीभेदांनी,धर्मभेदांनी ग्रासलेला असताना,उपेक्षित वंचित घटकातील गोरगरिबांचे प्रचंड शोषण होत असताना या अंधार्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी, त्यांचे अडाणीपण अज्ञानपण नाहीसे करण्यासाठी महात्मा फुलेंनी १८४८ झाली खास करुन मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू करून गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणाची दारं पुण्यातून पहिल्यांदा खुली केली असे प्रतिपादन पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते मारुती शिरतोडे यांनी आज पलूस येथे केले. जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त आयोजित शाळेच्या बालसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम शाळेतील मुलांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्वला रमेश पाटील या होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना मारुती शिरतोडे म्हणाले की महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व तळागाळातल्या लोकांना केवळ समजावूनच सांगितले नाही तर त्यांच्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन कृतीशीलपणे काम केले.पुण्यासारख्या शहरात विविध ठिकाणी अस्पृश्यांसाठी, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. शिक्षणाअभावी समाजाचं किती मोठं नुकसान होतं हे त्यांनी एकाच चरणात समाजाला समजावून सांगताना म्हटले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले,इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले… फुल्यांनी शिक्षणाबरोबरच सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य हाच खरा धर्म असून धर्म दिल जुनाट रूढी परंपरा यावर फार मोठा आसूड ओढला आहे. त्यांच्या विचारांचा वसा व वारसा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून मोठे व्हावे. म.फुले,सावित्रीबाई फुले यांच्यावरील पुस्तके वाचून काढावीत असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सौ.सोनाली चव्हाण यांनी केले तर आभार जगन्नाथ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास श्रीमती शैलजा लाड,सौ.सुनीता पवार,संभाजी पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.