By : Shankar Tadas
लोकदर्शन 👉
विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या आमसभेचे उद्गघाटन
नागपूर, दि, १० एप्रिल २०२२
महसूल खात्याच्या पाठीचा कणा असलेल्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक दर्जा आणि त्यानुसार वेतनश्रेणी मिळण्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.
भूमापनदिनाच्या अनुषंगाने आयोजित विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या ५३ व्या वार्षिक आमसभेचे उद्गघाटन पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते झाले. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गर्जे, सरचिटणीस श्रीराम खिरेकर, दाभेराव याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, जमिनीचा नकाशा तयार करण्यासह मालमत्तेची नोंदणी करण्याचे जिकिरीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून केले जाते. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या आणि इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विदर्भातील एकाही जिल्ह्यात नगर भूमापन कार्यालय नाही, याची सुद्धा दखल मी घेतली आहे. महसूलमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न निकाली काढतो, अशी हमी त्यांनी दिली.
भूमी अभिलेख विभागाने
सिटीसर्व्हे,शेतमोजणी आणि ड्रोन सर्व्हेद्वारे महाराष्ट्रातील सुमारे ४० हजार गावांचा सर्व्हे करून मिळकतधारकांना मालकी हक्काच्या मिळकत पत्रिका देण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विभागाचे कौतुक केले.
जमिनीची मोजणी व नकाशा काढणारे भूमी अभिलेख कर्मचारी हे खऱ्या अर्थाने भूमीरक्षक असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. जमिनीची मोजणी उत्तमप्रकारे करून लोकांचे आयुष्य सुसह्य करा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाला भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.