चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गावर सुशोभिकरण, पुल आणि उडडाणपुलाचे निर्माण करावे : आ.सुधीर मुनगंटीवार.

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर


*⭕नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट , सकारात्मक कार्यवाहीचे गडकरींचे आश्वासन*

चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गावर सुशोभिकरण, पुल आणि उडडाणपुलाचे निर्माण करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

दि. 5 एप्रिल 2022 रोजी आ सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री श्री नितिन गडकरी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन सादर केले.यावेळी माजी आमदार श्री सुदर्शन निमकर उपस्थित होते . या चर्चेत बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले , चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गावर सुशोभिकरण, पुल आणि उडडाणपुलाचे निर्माण करण्याबाबत आपल्या विभागाद्वारे चंद्रपूर जिल्‍हयामधून जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार व शिघ्रगतीने होत आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपूर ते गोंडपिपरी या राष्‍ट्रीय महामार्गाचे काम कोठारी गावातुन गेले आहे. कोठारी गावाची लोकसंख्‍या १२ हजार आहे. येथे मोठी बाजारपेठ, शाळा, दवाखाना, वनविभाग कार्यालय, विज कार्यालय, बॅंक, पोलिस स्‍टेशन इत्‍यादी मोठे शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. म्‍हणून कोठारी ग्रामवासियांनी कोठारी नाला ते तलावपर्यंत संपूर्ण रस्‍त्‍यावरती दुभाजकाचे बांधकाम त्‍या दुभाजकामध्‍ये स्‍ट्रीटलाईट व कोठारी नाल्‍यापर्यंत नाली बांधकामाचे मागणी केली आहे.

तसेच चंद्रपूर – मुल या राष्‍ट्रीय महामार्गाचे काम सुध्‍दा सुरू आहे. या महामार्गावर चंद्रपूर शहरामध्‍ये नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बंगाली कॅम्‍प हा परिसर येतो. त्‍यामुळे या चौकाचे सुशोभीकरण केल्‍यास चंद्रपूर शहराच्‍या सौंदर्यामध्‍ये अधिक भर पडेल. माझ्या या स्‍वप्‍नाला पूर्ण करण्‍यासाठी आपण जर संबंधित विभागाला सुचना केल्‍यास हे काम सुध्‍दा लवकरात लवकर पूर्ण होईल असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर-बल्‍लापूर-बामणी-राजुरा-देवाडा-लक्‍कडकोट-राज्‍यसिमा ते तेलंगणा हे राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) या राष्‍ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करणे सुरू आहे. चंद्रपूर स्थित दाताळा जवळील इरई नदीवर बनविलेल्‍या पुलासारखे या राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (डी) स्थित वर्धा नदीवर ब्रिज कम बॅरेज चे बांधकाम करण्‍याची मागणी करण्यात आली आहे.या ब्रिजचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरण केल्‍याने या महामार्गाच्‍या व शहराच्‍या सौंदर्यात भर पडेल. याच राष्‍ट्रीय महामार्गावर राजुरा शहराला लागून बायपासचे काम होणार आहे. या बायपासचा काही भाग वर्धा नदीच्‍या बॅक वॉटरमुळे पुरबाधीत क्षेत्र म्‍हणून निश्‍चीत झाले आहे. हा बायपास झाल्‍यामुळे कृत्रीम पुरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात जीवीतहानी होण्‍याची संभावना आहे. त्‍यामुळे या बायपासवर उडडाण पुल निर्माण करणे गरजेचे आहे. राजुरा शहरातुन जाणा-या मुख्‍य महामार्गावर रस्‍ता दुभाजक, चौपदरीकरण, विद्युतीकरण व सौंदर्यीकरण करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. परंतु महामार्ग प्राधिकरण द्वारा या रस्‍त्‍यावर केवळ डांबरीकरणाचे काम समाविष्‍ट करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे या कामांचा समावेश करून संबंधित विभागाला निर्देश दिल्‍यास हे काम सुध्‍दा तात्‍काळ पूर्ण होईल.राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (बी) वर गाव रामपूर (ता. राजुरा) वर एका पुलाचे बांधकाम करणे सुध्‍दा गरजेचे आहे असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

या सर्व मागण्या विभागाकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील व लवकरात लवकर ही कामे हाती घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी
दिले. जेव्हा जेव्हा जिल्ह्याच्या विकासासाठी मी निधीची मागणी केली तेव्हा तेव्हा आपण प्राधान्याने निधी उपलब्ध केला . चंद्रपूर जिल्ह्याविषयीची आपले प्रेम असेच कायम राहावे अशी अपेक्षा व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी ना. नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *