By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
* छत्रपती भोसलेंच्या राजघराण्यात पाम्बू पंचांग पूजेला मानाचे स्थान
मराठी नववर्षाचा प्रारंभ होत असलेला गुढीपाडवा हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण मुहूर्त मानला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर मराठी माणूस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करतो. महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या मराठी राजघराण्यांनीही या सणाची परंपरा जपली आहे. या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, इंदूर, गुजरातेतील बडाेदा व तामिळनाडूतील तंजावरच्या मराठी राजघराण्यांशी बाेलून त्यांची परंपरा जाणून घेतली…
*ग्वाल्हेर : राजवाड्यात अन् दिल्लीतही गुढीपूजन*
पुरणपोळी अन् श्रीखंडाचा नैवेद्य, देवी भागवताचे नऊ दिवस पठण
ग्वाल्हेरच्या जयाजी चौकातील जयविलास राजवाड्यात शिंदे राजघराणे परंपरेनुसार गुढी उभारते. तसेच ग्वाल्हेरी पंचांगाचे पूजन केले जाते. पूर्वी राजांची मिरवणूक काढली जायची, मात्र आता केंद्रीय मंत्री असलेले ज्याेतिरादित्य शिंदे दिल्लीत असतात, तेथील निवासस्थानीही गुढी उभारली जाते.पण राजघराण्याच्या मंदिरात डॉ. श्रीकृष्ण मुसळगावकर शास्त्री आणि त्र्यंबक शेंडे यांच्या हस्ते परंपरेप्रमाणे पूजा केली जाते. पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्र उत्सवाप्रमाणे देवीची स्थापना करून नऊ दिवस देवी भागवताचे पठणही केले जाते. राजघराण्याची परंपरा पाळण्यासोबतच जनतेची सेवाही अधिक महत्त्वाची आहे, असे ज्याेतिरादित्य मानतात. त्यामुळे ते दिल्लीत व आम्ही ग्वाल्हेरला पाडवा साजरा करतो, असे राजपुरोहित जयंत जपे यांनी सांगितले.
*इंदूर : मल्हारी मार्तंड मंदिरात साजरा होतो सोहळा*
सूर्याेदयापूर्वी घटस्थापना, सात गुढ्यांचा होळकर घराण्यात मान
होळकर घराण्याचे वारसदार आता इंदूरच्या राजवाड्यात राहत नाहीत. ते मुंबई आणि परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे राजवाड्यात अहिल्याबाई ट्रस्टतर्फे गुढीपाडवा साजरा केला जातो. मल्हारी मार्तंड मंदिरात पाडव्याची सुरुवात होते. सात मंदिरांत सात गुढ्या उभारल्या जातात. मुंबईतून उषाराजे मार्गदर्शन करतात. पुरणपोळी आणि श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जातो. यंदा मुंबईतही पाडवा साजरा करणार आहोत, असे यशवंतराव होळकर म्हणाले. राजपुरोहित लीलाधर वाईकर म्हणाले, सूर्याेदयापूर्वी घटस्थापनेची तयारी केली जाते. मोठी गुढीही उभारली जाते. सूर्यास्ताला उत्तरपूजा करून गुढ्या उतरवल्या जातात. राजवाड्यावर मात्र प्रशासनाच्या वतीने गुढी उभारली जाते. राजघराण्यातील नोंदीनुसार पूजाविधी होतो, अशी माहिती इतिहास संशाेधक रामभाऊ लांडे यांनी दिली.
*बडाेदा : लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये होतो उत्सव*
गादीपूजन-हुद्देपूजनालाही मान, कडुलिंब चटणी प्रसादाने सांगता
बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे वंशज समरजितसिंग, त्यांच्या पत्नी राधिका राजे यांच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते. तसेच गादीचे पूजन, हुद्देपूजन केले जाते. कडुलिंबाच्या चटणीचा प्रसाद घेतल्यानंतर उत्सव पूर्ण होतो, अशी माहिती राजपुरोहित ध्रुवदत्त व्यास यांनी दिली. हे राजघराणे सुधारणावादी आहे. सर्व सण-उत्सव राजपुरोहितांच्या मंत्रपठणाने साजरे केले जातात. राजघराण्याच्या सोळाव्या पिढीचे नेतृत्व करणारे समरजितसिंग गायकवाड पुरोगामी विचारांचे आहेत. मात्र, ते परंपरांनाही महत्त्व देतात. यंदाही लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये पूजा होईल. गणपती पूजन, कलशपूजन, दीपपूजन आणि कुलदैवत खंडोबाचे पूजन केले जाईल. पूर्वी मराठी पुरोहित पाडव्याची पूजा करत. आता मात्र बडोद्याचे व्यास (मारवाडी) पुरोहित चार पिढ्यांपासून पूजा करतात.
*तंजावर : व्यंकोजीराजेंच्या वंशजांचा पाडवा थाटात*
छत्रपती भोसलेंच्या राजघराण्यात पाम्बू पंचांग पूजेला मानाचे स्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाऊ व्यंकोजीराजे यांचे वंशज तंजावर (तामिळनाडू) राजघराण्यात गुढीपाडवा उत्साहाने साजरा करतात. या दिवशी पाम्बू पंचांगाची पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य असतो. राजघराण्याचे चंद्रमोहलीश्वर मंदिर आहे. या मंदिरात महादेव, श्रीविष्णू व पांडुरंगाची मूर्ती आहे. पाडव्याला रामपूजा, होमहवन केले जाते. चंद्रमोहलीश्वर मंदिरावर भव्य गुढी उभारली जाते. शाही कुटुंबीयांसह ५० माणसांचे भोजन तयार केले जाते. खास तामिळ पद्धतीचे सांबरही केले जाते. छत्रपती बाबाजीराजे भोसले, युवराज छत्रपती आबाजीराजेे, राजमाता विजयाराजेे, गायत्रीराजे, धनश्रीराजे, शिवप्रियाराजे, शिवांजलीराजे, अवंतिकाराजे पूजेत सहभागी होतात. या राजघराण्याने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. अन्नछत्रही चालवले जाते.