लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी.*
उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे, अस्पृश्यता निवारण आणि सत्री शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती गठीत करावी, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दिनांक २३ मार्च २०२२ रोजी विधानसभेत विनियोजन विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना आ. मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यासाठी मी अशासकीय ठराव मांडला होता. या ठरावावरील चर्चेदरम्यान सरकारने विधीमंडळ सदस्यांची समिती नेमण्यात येईल असे आश्वासन दिले होते. अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. ही समिती नेमून मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवावे असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे व अद्यापही करीत आहेत. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आपला पाठपुरावा अव्याहतपणे सुरू राहील असेही आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.