लोकदर्शन 👉 संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
आज जागतिक निद्रा दिन (वर्ल्ड स्लीप डे) !
मार्च महीन्याच्या *तिसऱ्या शुक्रवारी* हा दिवस साजरा केला जातो.
साधारणतः एक व्यक्ती दिवसातील आठ तास झोपते असं गृहित धरलं तर आपलं एक तृतीयांश आयुष्य झोपेतच जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आरोग्य चांगले रहाण्यासाठी माणसाला ठराविक वेळा शांत झोप लागणे आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी अन्न पाण्याइतकेच झोपेलाही महत्व आहे.
शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात.
झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. ‘स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ता प्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते.
सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो.
काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाज माध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्या समोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे.
प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगा सारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे.
आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते. परंतु हल्ली रात्री तरुण पिढी मध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे.
भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यां मध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्ती मध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो.
शालेय विद्यार्थ्या मध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या बरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
*झोपेची सायकल म्हणजे ?*
झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते.
प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट