लोकदर्शन 👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
आरशातील प्रतिमाच जर आपल्यासमोर उभी राहिली, तर ? असे प्रत्यक्ष घडणे अजून तरी शक्य नाही. पण त्या दिशेने अनुवंशशास्त्राचे प्रयत्न मात्र सतत चालू आहेत. स्वतःचे बीज पुनरुत्पादनासाठी राखून ठेवावे व अनंत काळाने त्यापासून वंश निर्माण करावा इथपर्यंतच आपली प्रगती थाटलेली आहे.
क्लोन म्हणजे हुबेहूब जुळणारी, तंतोतंत तशीच निर्मिती. अनेकदा जुळी भावंडे आपल्याला वेगळी ओळखता येत नाहीत, अगदी तशीच एखाद्याची जुळी आकृती प्रत्यक्षात तयार करता आली तर त्याला क्लोन असे म्हणता येईल. यालाच प्रतिकृती म्हणता येईल काय ? निदान इथे तरी आपण तसे म्हणू यात.
विश्वामित्राचा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न फसल्याची पुराणात नोंद आहे. अद्यापतरी सर्व प्रयत्न तसेच फसत आहेत. मात्र वनस्पतींमध्ये तंतोतंत प्रकृत प्रतिकृती निर्माण करण्यात अनेक बाबतीत यश मिळालेले आहे. झाडाच्या फांदीचा छाट, झाडाचा कलमासाठी बांधलेला डोळा, पानफुटीचा तोडलेला तुकडा ज्याप्रमाणे झपाट्याने अगदी हुबेहूब मूळ प्रतिकृती तयार करतो, तसे प्राण्यांच्या बाबतीत करायचा मानवाचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत या दिशेने यश बेडकांच्या बाबतीत मिळाले आहे. डॉक्टर गार्डन यांनी ऑक्सफर्डमध्ये १९६२ मध्ये बेडकांच्या अंड्यातील केंद्रक काढून घेतला व त्या जागी दुसऱ्या बेडकाच्या आतड्यातील अंतस्त्वचेच्या पेशी घातल्या. या पद्धतीने त्यांनी काही लहान लहान बेडूक तयार करण्यात यश मिळवले आहे. हे लहान लहान बेडूक अगदी एकसारखे व मोठ्या मूळ बेडकाची आठवण करून देणारे होते, कारण त्याच्याच जनुकांपासून त्यांची निर्मिती झाली होती.
प्रतिकृती निर्माण करण्यातला मुख्य टप्पा म्हणजे मूळ आकृतीचे जीन्स व जनुके मिळवणे व त्यांची कृत्रिमरित्या वाढ करून त्यांपासून प्रतिकृती तयार करणे हा आहे. बीजांड फलित झाल्यावर निर्माण होणारा वंश एकतर स्त्री व पुरुष या दोघांपैकी एकासारखा असेल व दोघांचे थोडे थोडे रंगरूप घेतलेला असेल; पण प्रतिकृती निर्माण करताना फलित बीजांड वापरण्याची कल्पनाच मुळात नसते ! डॉली या नावाने प्रसिद्ध झालेल्या मेंढीची या पद्धतीने निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. सस्तन प्राणिवर्गातील क्लोन पद्धतीच्या निर्मितीचा हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. मानवी निर्मिती अशाच पद्धतीने शक्य आहे, असे त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. मात्र याच डाॅलीला काही वर्षांतच संधिवाताच्या आजाराने पछाडले. त्यामुळे अशा क्लोननिर्मिती प्राण्याच्या सक्षम जीवन जगण्याबद्दल प्रश्न उभे राहिले आहेत.
निसर्गतः झाडांवर वाढणारे, पंख असलेले काही मोजके किडे (Aphids) या प्रकाराने स्वतःची निर्मिती करू शकतात. ही गोष्ट तशी अपघातानेच लक्षात आली आहे. या किटकातील एकाच वेळी निर्मितीसाठी नर वा मादी हे भेद अस्तित्वात नाहीत, हे लक्षात आले. तरीपण एकाच कीटकापासून जवळपास शंभर शंभर कीटक जन्माला येत असल्याचे नोंदले गेले आहे. यातूनच ही प्रतिकृती निर्माणाची बाब लक्षात आली
मानव सध्या जेनेटिक इंजिनिअरच्या साहाय्याने क्लोनची निर्मिती करू पाहत आहे.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*’सृष्टी विज्ञानगाथा’ या पुस्तकातून*