लोकदर्शन👉संकलन – सुरेखा नेसरीकर.
कोल्हापूर. 9028261973.
साभार – संदीप काळे
भ्रमंती लाईव्ह पुण्यातली मीटिंग आटोपून मागच्या आठवड्यात मी गजानन मोरे यांचे भाऊ लक्ष्मण मोरे यांच्याकडे आळंदीला गेलो. लक्ष्मण यांचं आळंदी फाट्यावर मोबाईलचं दुकान आहे. मी आणि गजानन मोरे खूप वर्षांनी आल्यामुळे लक्ष्मणला खूप आनंद झाला. आमच्यासोबत भीमेश मुतुलापण होते. लक्ष्मणच्या दुकानावर चहा-पाणी झाल्यावर माझी नजर सहज बाहेर असणाऱ्या बाकावर हातात हात घालून झोपलेल्या आजी-आजोबांवर गेली. मला वाटलं कुणीतरी प्रवासी असतील. त्यांनी पकडलेला एकमेकांचा हात यावरच माझी नजर जात होती. ते दोघे उठले, बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवरचा चहा घेत-घेत दोघांचा संवाद सुरू होता. असं वाटत होतं, या दोघांच्या संवादाचा प्रत्येक शब्द न् शब्द लिहून घ्यावा. ‘‘पायाचं दुखणं कमी झालं का? मानेची ठणक कमी झाली का? अहो दुर्लक्ष करा, होईल कमी. घरी गेलो की जरा शेकून देते. रात्रीचा भागवद् गीतेमधला प्रसंग आपल्या आयुष्याशी संबंधित आहे…’’ आजी आजोबांना बोलत होती आणि आजोबा हो-हो म्हणून ऐकत होते. अनेक गाड्या तिथं येत होत्या, थांबत होत्या, जात होत्या; पण एकाही गाडीत आजी-आजोबा जात नव्हते. त्या दोघांचंही त्या येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष नव्हतं. माझ्या लक्षात आलं, हे आजी-आजोबा कुठंही जाणारे नव्हते. मी ‘एल.एम.’ म्हणजे लक्ष्मण मोरे (९८२३७८०००५) यांना विचारलं, ‘हे आजी-आजोबा कोण आहेत आणि इथं का बसलेत?’ एल.एम. बोलण्याच्या अगोदर एल.एम.कडे मोबाईल घेण्यासाठी आलेली एक व्यक्ती म्हणाली, ‘‘हे आजी-आजोबा आमच्या आळंदी फाट्यावरचे लैला-मजनू आहेत.’’ ती व्यक्ती बोलता-बोलता सहज बोलली. मला काही कळेच ना! मी एल.एम. यांना विचारलं, ‘हे गृहस्थ असं का बोलतात?’ त्यावर एल.एम. लगेच म्हणाले, ‘‘बरोबर आहे त्यांचं. ते लैला-मजनू म्हणून सर्वत्र परिचित आहेत.
लोक त्यांना लैला-मजनू म्हणतात.’’ मी म्हणालो, ‘‘असं का?’’ एल.एम. म्हणाले, ‘‘त्यांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे की, लैला-मजनूही त्यांच्यापुढे फिके पडतील.’’ मी पुन्हा म्हणालो, ‘‘कसं काय?’’ एल.एम. म्हणाले, ‘‘आज बारा वर्षं झाली, यांना आम्ही पाहतोय. हे दोघेजण नेहमी इथं येऊन बसतात. दोघेजण एकमेकांना एक सेकंद सोडून राहत नाहीत. आजोबांचे दोन्ही डोळे निकामी झाले, तेव्हा आजीने बाजूच्या मराईदेवीला नवस केला होता, ‘मी एक महिनाभर डोळ्यांवर पट्टी बांधून तुझी भक्ती करते.’ आजीने तसं केलं.’’ आजी आणि आजोबांना घेऊन एल.एम. अनेक किस्से मला सांगत होते आणि मी ऐकत होतो. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे हे दोघेजण वाटत होते.मी एल.एम.ना म्हणालो, ‘‘मला या दोघांशी बोलायचं आहे.’’ एल.एम. यांनी त्या दोघांना माझी ओळख करून दिली. आजोबांचे न दिसणारे डोळे आणि आजीचे न ऐकू येणारे कान माझ्याकडं टवकारून पाहत होते. माझ्यासोबत असणाऱ्या भीमेशने गाडीतून असणाऱ्या पाचही शाल आणल्या आणि काकडत बसलेल्या आजी-आजोबांवर टाकल्या. आजी भीमेशकडे पाहत म्हणाल्या, ‘‘बाबा खूप आशीर्वाद रे लेकरा, खूप पुण्य लागेल तुला.’’ आमचं बोलणं सुरू झालं आणि आजी-आजोबा यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही समोर आले. बाप रे, किती धक्कादायक हा प्रवास!
मी ज्या आजोबांशी बोलत होतो त्यांचं नाव किसनराव धाडगे, वय वर्षं ८३. त्यांच्यासोबत असणाऱ्या आजी म्हणजे त्यांची पत्नी सीताबाई धाडगे, शहर जळगाव. हल्ली मुक्काम आळंदी फाटा. किसनराव यांना त्यांची पहिली पत्नी गीताबाई यांच्याकडून तीन मुलं झाली. दुसरी पत्नी सीताबाई यांच्याकडून एक मुलगा होता. किसनराव जळगावात व्यापारी होते. हात-पाय चालत राहतील तोपर्यंत किसनराव यांनी आपल्या कुटुंबासाठी हालअपेष्टा सहन केल्या. शेत, घर घेत तिन्ही मुलांना उभं करून दिलं. पस्तिशीमध्ये गीताबाई मरण पावल्या. सीताबाई… किसनराव यांची मैत्रीण. त्या घटस्फोटित होत्या. त्यांना एक मुलगा होता. किसनराव आणि सीताबाई या दोघांनी लग्न केलं. सीताबाईंचा मुलगाही किसनराव यांनीच लहानाचा मोठा केला. ‘‘कारभार मुलांच्या हातात गेल्यावर मुलांना सावत्र आई आणि सावत्र भाऊ नको वाटायला लागले. रोज घरात भांडण होत होतं, वाद विकोपाला जात होते. एकेदिवशी तिन्ही भावांनी मिळून आम्हा तिघांना घराच्या बाहेर काढलं. माझ्यासोबत झालेल्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसेल म्हणून आम्ही घर सोडलं. एका ओळखीच्या मित्राच्या मदतीने आम्ही आळंदी गाठलं. सोडून दिलेले अनेक आई-वडील इथं आहेत, ज्यांना कुणी वाली नाही. कुणी मंदिरात मागून खातात, कुणी चार घरी मागून खातात.’’ आजोबा हे मला त्यांचा थक्क करणारा प्रवास सांगत होते. आमचं बोलणं सुरू असताना एक महिला आजी-आजोबांना जेवायला घेऊन आली होती. आजी त्या मुलीला आशीर्वाद देत म्हणाली, ‘‘बाई, पोरगी पाहिजे गं मढ्यावर रडायला. चार-चार मुलं असून आयुष्याला काही अर्थ नाही.’’ असं म्हणून आजी पदर तोंडात धरून रडत होती. मी विचारलं, ‘आज्जी, तुम्ही का रडत आहात?’ आजी म्हणाल्या, ‘‘मला तीन मुली झाल्या होत्या. तिन्हीही मुली बाळंतपणात गेल्या. माझ्या चौथ्या वेळेला गर्भ राहिल्यावर माझ्या नवऱ्याला एका ज्योतिष्याने सांगितलं, तुला चौथ्या वेळेसही मुलगीच होणार आहे. माझ्या नवऱ्याने अभागी म्हणत मला माहेरी पाठवलं. माझं पहिलं लग्न तुटलं. मुलगा गर्भामध्ये असताना माझं यांच्याशी लग्न झालं.’’ मी आजीला बोलताना मध्येच विचारलं, ‘आता तो मुलगा कुठं आहे?’ आजी शांत होऊन वर आकाशात पाहात म्हणाली, ‘‘पांडुरंगाला माहिती बाबा कुठं आहे.’’ त्यावर आजोबा लगेच म्हणाले, ‘‘माझ्याकडे जे काही थोडंफार होतं, ते घेत मी हिच्या मुलाला घेऊन आळंदीला आलो. त्या मुलावर आम्ही दोघांनी खूप प्रेम केलं, त्याला शिकवलं. असं वाटत होतं, हाच आमच्या म्हातारपणाची काठी आहे. त्याचं लग्न केलं. एका वर्षात तो आणि त्याची बायको दोघंही आहे ते सर्व विकून गायब झाले. आता दोन वर्षं झाली, ते कुठं आहेत, काय करतात आम्हाला नाही माहिती.’’ आजीला फार कमी ऐकू येत होतं म्हणून खूप जोरात बोलायला लागायचं. आजोबा बोलण्यात खूपच हुशार होते. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काहीही नव्हतं, जे काही कमावलं ते कष्टाच्या जोरावर. मुलांसाठीच ना? मुलांनी एका शब्दानं सांगितलं असतं की, आई-बाबा तुम्ही आम्हाला नको आहात, तरी आम्ही घर सोडून कधीच बाहेर पडलो असतो. आमचा अपमान करून, आम्हाला मारझोड करून बाहेर करण्याचं काहीही कारण नव्हतं. आता नातवाला पहावंसं वाटतं. जळगावमध्ये गेलं की लोक तोंड काढू देत नाहीत, वाटेल ते बोलतात. आयुष्यभर कमावलेला स्वाभिमान पोरांच्या-बायकांच्या आंधळ्या प्रेमापोटी पायदळी तुडवला गेला. बिचारे सगळे आनंदात राहावेत, एवढीच आमची इच्छा आहे.’’ असं म्हणत आजोबा बिचारे खूप रडत होते. आजी आजोबांची समजूत काढत म्हणाली, ‘‘अहो तुम्ही शपथ घेतली होती ना, रडणार नाही म्हणून. मोडली ना माझी शपथ.’’ रडणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावर आजीच्या बोलण्यानंतर लगेच हास्य फुललं. एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवणं, हातात हात घालून बसणं हे सारं आजी-आजोबांचं वागणं नव्याने प्रेमात पडलेल्या प्रेमी जोडप्यासारखं होतं.
आम्ही तिघंही तिथून निघालो. मी खिशात हात घातला, आजीच्या हातावर काही पैसे ठेवले आणि मी नांदेडला जाणाऱ्या बसमध्ये बसून प्रवासाला लागलो. आजी आणि आजोबांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. आई-वडिलांना घरातून बाहेर काढणारे, आई-वडिलांना घरात असून वाळीत टाकणारे, अबोला धरून आई-वडिलांचा अपमान करणारे, दिखाव्यासाठी आई-वडिलांची सेवा करणारे, अशा त्या प्रत्येक मुलाला, सुनेला जसं जमेल तसं, जमेल तिथं अद्दल घडविणे हे आपलं काम आहेच. बरोबर ना..! जे आई-वडिलांना छळतील त्यांना त्यांच्या कर्माचे भोग म्हातारपणात पाहायला मिळतातच याची कित्येक उदाहरणं आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. आपल्याला कधी पीडित असणाऱ्या आई-वडिलांची कुठं सेवा करायची संधी मिळाली, तर आपण नक्की करू…! आपण करणार ना…?
सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973*
1 मार्च 2022.