गडचिरोली :
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी १९ फेब्रुवारी २०२२ ला किलबिल नेचर क्लबच्या वतीने ‘शिवोत्सव : रंगोत्सव’ हा एक आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. आमच्या किलबिल नेचर क्लबचे मार्गदर्शक आणि गडचिरोली शहरातल्या वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक शेमदेव चाफले सर त्यांच्या शाळेची रंगरंगोटी करत होते. तेव्हाच ही कल्पना डोक्यात आली. खरेतर हा प्रयोग आम्ही मागे आमच्या ‘‘मामाच्या गावाला जाऊया’ या निवासी निसर्ग शिबिरात केला होता. तेव्हा मुलांनी आमचे ज्येष्ठ मित्र हेमंतभाऊ जंबेवार यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर आश्रमशाळेतील एक हॉल वारली चित्रांनी सुशोभित केला होता. मग, आम्ही मुख्याध्यापक चाफले सरांना त्यांच्या शाळेच्या भिंतीला व्हाईट वॉश करायला सांगितलं. शिवजयंतीच्या दिवशी सकाळीच आमच्या किलबिल नेचर क्लबची किलबिलणारी पाखरं शाळेच्या आवारात गोळा झाली. सुरुवात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करून आणि त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन केली. त्यानंतर आमचे चित्रकार मित्र अनिल बारसागडे यांनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचं बक्षिस वितरण झालं. त्यानंतर मुलांना एका वर्गखोलीत बसवून बारसागडे सरांनी त्यांना वारली चित्रं अतिशय सोप्या पद्धतीनं शिकविली. भिंतीवर आधीच गेरूनं आम्ही सीमारेषा आखून घेतली होती. सगळे बाल मावळे पांढऱ्या शुभ्र चकचकीत भिंतीपुढे हातातले कुंचले तलवारीसारखे फिरवत रंगाचे फटकारे मारू लागले आणि भिंती बोलक्या होऊ लागल्या. या सृजन सोहळ्यात त्यांचे पालक आणि शाळेचे शिक्षकही सहभागी झाले. सारेच असे चित्रांच्या, रंगांच्या दुनियेत हरवल्यावर आम्ही कसे मागे राहणार ? मग आमचे किलबिलचे सारेच सहकारी हाती कुंचले घेऊन बाल मावळे झाले(मीसुद्धा). खास या कार्यक्रमासाठी आमचे मित्र पोर्ल्र्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी राकेश मडावी आपल्या दोन मुलांना पोर्ल्र्याहून घेऊन आले होते. आमचे मार्गदर्शक राजूभाऊ (बोधराज)इटनकर पूर्णवेळ उपस्थित होते. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचे फाेटाे काढलेच पण चित्रांनी सुंदर झालेल्या भिंतींपुढे उभं राहात मनसाेक्त सेल्फीही काढून घेतल्या. दाेन दिवसांनी वसंत विद्यालयासह चंद्रपूर, गडचिराेलीत अनेक शाळा संचालित करणाऱ्या चांदा शिक्षण मंडळाचे संचालक मंडळ शाळेत आले. माझे ज्येष्ठ मित्र प्रसिद्ध इतिहात संशाेधक आणि चांदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशाेकसिंह ठाकूर (तसं मी त्यांना अशाेक भैय्याच म्हणताे) यांनी खुप प्रशंसा केली. संपूर्ण मंडळाने माझ्यासह या भिंतीपुढे फाेटाे काढून घेतले. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद ! खरंतर किलबिल नेचर क्लबची चळवळ आम्ही केवळ बालकांसाठीच सुरू केली नाही, तर काळाच्या ओघात आपलं हरवलेलं बालपण जगायची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी सुरू केली आहे. तेव्हा पुढच्या उपक्रमात तुमचंही स्वागत आहे.
—————
सौजन्य : मिलिंद उमरे यांची फेसबुक पोस्ट